फिनलंड शिक्षणात जगात का भारी
मित्रांनो आपण यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतोय. या वर्षीचा स्वातंत्र्यदिन सर्व भारतीयांसाठी एक आनंदाचा व अभिमानाचा सोहळा आहे. यानिमित्ताने देशाच्या उत्कर्षासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या शैक्षणिक क्षेत्राचे गेल्या ७५ वर्षाचे सिंहावलोकन करणे एक सुजाण नागरिक म्हणून अत्यंत आवश्यक वाटते. ७५ वर्ष उलटूनही अजूनही आपण आपल्या देशातील सर्व बालकांना मोफत व दर्जेदार शिक्षण देवू शकलो नाहीत याची एक भारतीय म्हणून खंत वाटते. अनेक बाबी अद्ययावत करणे सहज शक्य होते परंतु आपण जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले. आपण भारतीय जाती-धर्माच्या राजकारणामध्ये पूर्ण गुरफटून गेलो आहोत. थोर स्वातंत्र्य सेनानींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश खऱ्या अर्थाने लोकशाही गणराज्य होईल असा विश्वास त्यांना वाटला असावा. परंतु मित्रांनो आपण खरचं स्वातंत्र्य उपभोगत आहोत का? असा प्रश्न मनाला पडतो. आजही आपण सर्वजण राजकीय गुलामगिरीत आहोत असे मला वाटते. यामुळे आपला देश प्रगतीच्या दिशेने अतिशय संथगतीने प्रवास करत आहे. स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष होऊन देखील अजूनही आपण विकसनशील देशाच्या यादीमध्ये आहोत. रोजगारनिर्मिती, लोकसंख्यावाढ, प्रदूषण, गरीबी, सीमावाद ही आपल्या देशासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. ह्या सर्व आव्हानावर मात करण्याचं सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे. जोपर्यंत आपण शिक्षणाला प्राधान्य देऊन आपल्या बजेट मध्ये भरीव अशी तरतूद करत नाहीत, नवनवीन तंत्रज्ञान व नवनवीन शिकण्याची व शिकवण्याची तंत्रे स्वीकारत नाहीत, शिक्षणामध्ये सर्व बालकांना समान संधी देत नाही, तोपर्यंत देशातील सरकारी शाळा व त्या शाळेतील विद्यार्थी खऱ्या अर्थाने सक्षम होणार नाहीत व तो पर्यंत आपला देश प्रगत राष्ट्र होऊ शकत नाही. भारतात शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आपल्याला दिसतं. नर्सरी पासून पालकांना पाच हजार ते दोन लाखापर्यंत फी आकारली जाते. विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण होईपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च होतात. अन हे सर्व पैसे शिक्षणसम्राटांच्या खिशात जातात. विद्यार्थी व पालक दोघेही कर्जबाजारी होतात. एवढं सगळं कर्ज डोक्यावर असल्यावर या देशाच्या पिढीकडे सामाजिक भान असण्याची व त्यांनी देशाची सेवा करण्याची अपेक्षा आपण त्यांच्याकडे काशीकाय ठेवू शकतो? खरं तर शिक्षण व आरोग्य सेवा ही कोणत्याही राष्ट्राचा कणा असतो. जगातील जे प्रगत राष्ट्र आहेत त्या देशातील सर्व बालकांना प्राथमिक व उच्चप्राथमिक शिक्षण मोफत व दर्जेदार मिळते. या प्रगत राष्ट्रांमध्ये जवळपास सर्व शाळा सरकारीच आहेत व शिक्षणात अजिबात खाजगीकरण झालेले नाही. हे देश शिक्षण क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून नाही तर राष्ट्र विकासाचे साधन म्हणून याकडे पाहतात. यामुळे हे देश शिक्षणाच्या व पर्यायाने विकासाच्या बाबतीत जगात अव्वल आहेत. कोणत्याही देशासाठी आपल्या देशाच्या शिक्षणातील गुंतवणूक ही देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. आज आपण असाच एक देश पाहणार आहोत ज्यांच्या शिक्षण पध्दतीचा आदर्श संपूर्ण जगाने घ्यावा असे तेथील शैक्षणिक वातावरण आहे. केवळ शिक्षणाच्या जोरावर या देशाने उत्तुंग झेप घेतलेली आहे.
जगाच्या पाठीवर फिनलंड हा एक असा देश आहे ज्यामध्ये १९४७ मध्ये म्हणजे आपला देश स्वातंत्र्य झाला तेव्हा जंगलाच प्रमाण जास्त होतं. देशाला पुढे न्यायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे या देशाने जाणलं. अन त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज हा देश सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणात जगात अव्वल आहे. जगातील सर्वांत आनंदी देश फिनलंड आहे. गुणवत्तेमध्ये जगात अव्वल आहे. या देशाची लोकसंख्या फक्त ५५ लाख आहे. यावरुन फिनलंड किती चिमुकला देश आहे, याची कल्पना येते. इथली शिक्षण व्यवस्था जगातली सर्वांत चांगली मानली जाते. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनाही त्याने मागे टाकले आहे. फिनलंड शंभर टक्के साक्षर देश आहे. इथले विद्यार्थी जगात सर्वांत जास्त हुशार विद्यार्थी म्हणून गणले जातात. त्यांच्यात नापास होण्याचं प्रमाण जवळ जवळ शून्य असतं. पीआयएसए PISA (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट) नावाची संस्था जगातल्या १५ वर्षांच्या शिकणाऱ्या मुलांचं गणित, विज्ञान आणि इतर विषयांच्या अनुषंगानं परीक्षण करते, तर त्या संस्थेच्या निकषांत फिनलंडचे विद्यार्थी कायम सर्वोच्च स्थानी असतात.
या देशामधील मुलांचं शिक्षण हे ७ वर्ष पूर्ण झाल्यावर सुरू होतं अन तेही अगदी मोफत. या देशात बालकांसाठी ७ वर्षाअगोदर कोणत्याही प्रकारची शाळा या देशात उपलब्ध नाही. ७ वर्षाअगोदर शाळेत पाठवणे हा या देशात ‘गुन्हा’ समजला जातो. या देशामध्ये जवळपास सर्व विद्यार्थी हे सरकारी शाळेत शिकतात. फिनलंड मध्ये शहरी व ग्रामीण शाळांतील सुविधा व शिक्षणाच्या दर्जामध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही. शहरी व ग्रामीण शाळेत समान दर्जाचे शिक्षण दिले जाते. येथे प्रत्येक २० विद्यार्थ्यां मागे एक शिक्षक असतो. एका वर्गात २० च विद्यार्थी असतात. फिनलंड मध्ये विद्यार्थी सरासरी शिक्षक गुणोत्तर १४:१ असे आहे तर भारतात हेच गुणोत्तर ३५:१असे आहे. इयत्ता १ ली पासून ६ वी पर्यंत एकच शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो. ६ वी ते ९ वी ला विषय शिक्षक असतात. दिवसाची एकूण ८ तास शाळा असते त्यात प्रत्येक तास हा ६० मिनिटांचा असतो त्यात १५ मिनिटे छोटी सुट्टी असते. प्रत्येक बालकाने आठवड्याला किमान २० तास शाळेत येणे आवश्यक असते. शाळेची वेळ सोमवार ते गुरुवार सकाळी ९:४५ ते ५ अशी असते. शुक्रवारी अर्धा दिवस शाळा तर शनिवार व रविवारी पूर्ण दिवस सुट्टी असते. या विद्यार्थ्यांना दररोज अगदी थोडा गृहपाठ दिला जातो जो फक्त अर्ध्या तासात पूर्ण होतो. येथील प्रत्येक विद्यार्थ्यांना सरकारकडून टॅबलेट दिला जातो त्यात इन्ट्रॅक्टइव्ह बेस अभ्यासक्रम भरलेला असतो. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके शाळेत घेऊन यावे लागत नाही. इतर आवश्यक पुस्तके व वह्या लेखन साहित्य शाळेत प्रत्येक वर्गखोलीत ठेवलेले असते. दुपारचे जेवण अतिशय दर्जेदार, वैविध्यपूर्ण व सकस असते. ते विद्यार्थ्यांना हवे तेवढे मिळते. १ ली ते ९ वी पर्यंत विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही. सर्वंकष व सातत्यपूर्ण मूल्यमापन सारखी पद्धती प्रभावीपणे सर्वांगीण मूल्यमापनासाठी वापरली जाते. विद्यार्थ्यांना या मूल्यमापन पद्धती अंतर्गत मिळालेले गुण कोठेही शेअर केले जात नाहीत तर ते शासनस्तरावर फक्त विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विचारात घेतले जातात. जास्तीत जास्त ज्ञानरचनावादी पध्दतीने अध्यापन केले जाते. फक्त शिक्षकांनी अध्यापन करून शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या स्वतः शिकण्यावर जास्त भर दिला जातो. शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध या सारख्या कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परिक्षांना या देशात अजिबात थारा नाही. त्यामुळे वर्गात विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये व पालकांमध्ये ईर्ष्या किंवा नैराश्य हे कधीच वाट्याला येत नाही. येथे शिक्षक व विद्यार्थी स्वतः शी च स्पर्धा करताना दिसतात ज्यामुळे त्यांची प्रगती ही कोणत्याही दडपणाशिवाय व पोपटपंची न करता होते. येथे विद्यार्थ्यांचा शाश्वत विकास करण्यावर जास्त भर दिला जातो. ( जसे वक्तृत्व, गायन, अभिव्यक्ती, संवादकौशल्य, नवनिर्मिती, तार्किकता) वर्गातील बौद्धिक क्षमतेच्या अभावामुळे किंवा विशेष गरजामुळे मागे राहिलेल्या बालकांना विशेष शिक्षकांची शासन सोय करून त्यांना इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणले जाते. या देशात हुशार विद्यार्थ्यांपेक्षा जे विद्यार्थी अध्ययन क्षमतामध्ये मागे आहेत त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते. यामुळे या देशात एकही बालक अप्रगत राहत नाही.
या देशात वयाच्या १६ व्या वर्षांपर्यंत शिक्षण अगदी मोफत आहे, अन सरकारला त्यानंतर सुद्धा सामान्य शिक्षण व व्होकेशनल शिक्षण हे अगदी मोफत द्यावे लागत फक्त पालकांना प्रवासाचा खर्च करावा लागतो. विशेष म्हणजे या देशात वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही. १६ व्या वर्षानंतर देशातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मेट्रिकलेशन टेस्ट द्यावी लागते जी सर्वांना बंधनकारक नसते. १६ वर्षानंतर सुद्धा व्होकेशनल शिक्षण व सर्वसामान्य शिक्षण असे दोन भाग पडतात. व्होकेशनल शिक्षणासाठी ही टेस्ट देणें गरजेचे नाही पण सामान्य शिक्षणासाठी( ग्रॅज्युएशन, पदविका, इ.) ही टेस्ट देणे गरजेचे आहे. या देशात शिक्षक बनने हे येथील तरुणांसाठी एक स्वप्न असतं. कारण तेथे शिक्षकांना खूप सन्मान दिला जातो. येथे शिक्षक होण्यासाठी अतिशय खडतर परीक्षा द्यावी लागते. शिक्षक होण्यासाठी तरुणांना या देशात पाच वर्षांचा मास्टर डिग्री कोर्स पूर्ण करावा लागतो. शिक्षक म्हणून निवड करताना अभ्यासू वृत्ती, कल्पकता, ज्ञान, नाविन्याची ओढ व विद्यार्थ्यांशी वागण्याचा स्वभाव हा फार कटाक्षाने तपासला जातो. शिक्षकांना या देशात अनेक अधिकार दिलेले असतात. शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त कोणतेही काम लावली जात नाहीत. शिक्षकांच्या प्रयोगशीलतेला कमालीचे प्राधान्य दिले जाते. शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शकांच्याकडून उत्कृष्ट दर्जाची नियमित प्रशिक्षणे दिली जातात ती लादली जात नाहीत. शिक्षकांना आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ कधीच या देशात येत नाही. मित्रांनो कोणत्याही तरुणाला जर अशा देशात शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर कोणाला आवडणार नाही? आपल्या देशात मात्र परिस्थिती वेगळी आहे. ‘मागता येत नाही भीक, तर मास्तरकी शिक’ अशी परिस्थिती आपल्या देशात आहे. त्यामुळे प्रतिभावान तरुण या क्षेत्रात येण्यासाठी अजिबात इच्छुक नाहीत. आपल्या देशात शिक्षक होण्यासाठी सरकारी व खाजगी यंत्रणेत प्रचंड भ्रष्टाचार होतो हे सर्वश्रुत आहे. परिस्थितीमुळे नाईलाजाने काही प्रतिभावान तरुण या क्षेत्रात येतात. इष्ट बदलाच्या दृष्टीने नवनवीन प्रयोग करतात. पण अशा प्रयोगशील व नाविन्याचा ध्यास असणाऱ्या शिक्षकांना ‘गुन्हेगार’ ठरवले जाते, त्यांना व्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातात जे शिक्षणक्षेत्रात आवश्यक इष्ट बदलाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या वेळी आपण तरुणांमधील क्रमांक एकची प्रतिभा या क्षेत्रात आणू त्यावेळी नक्कीच या क्षेत्रात आमूलाग्र बदल दिसतील यासाठी नागरिकांनी सजग राहायला हवं व सरकारने यादृष्टीने पाऊले उचलायला हवीत.
आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणात सर्व बालकांना समान संधी व सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक वाटते. असे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण हे आपल्या देशातील प्रत्येक बालकाला मिळायला हवे, तेव्हा अन तेव्हाच आपला देश डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील देश बनेल असा विश्वास वाटतो. नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अनेक आधुनिक अध्यापन पद्धतींचा व नवनवीन बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे हे शैक्षणिक धोरण नक्कीच देशाच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती करेल असा विश्वास वाटतो. फक्त या धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हायला हवी. हे धोरण प्रभावीपणे राबवण्यासाठी आपण सर्वांनीच एक सुजान नागरिक म्हणून प्रयत्नशील राहून देशाला प्रगत राष्ट्र बनवण्यासाठी ज्या ज्या चांगल्या बाबी इतर प्रगत देशांमध्ये राबवल्या जात आहेत त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या सरकारकडे आग्रही असणे अत्यंत गरजेचे आहे. यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करतोय अन तो करायलाही हवा. हा एक आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. पण हा उत्सव तेव्हा आणखी आनंदाने साजरा करता येईल जेव्हा आपण आपल्या देशातील प्रत्येक बालकाला मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकू. सर्व बालकांना शिक्षणात समान संधी देऊ शकू. अन मला विश्वास वाटतो की आपण सर्वांनी जर मनापासून प्रयत्न केला, प्रत्येकाने काही ना काहीतरी योगदान शिक्षणक्षेत्रासाठी दिले त्यातून देशातील प्रत्येक बालकाला मोफत व दर्जेदार शिक्षण मिळाले तर नक्कीच आपण एक भारतीय म्हणून स्वातंत्र्याचा शतक महोत्सवी सोहळा आपण मोठ्या आनंदाने व अभिमानाने साजरा करू शकतो, असा ठाम विश्वास वाटतो.
--------------------------------------------
No comments:
Post a Comment