Wednesday, 14 December 2022

मोबाईल : अफूची गोळी

मोबाईल : अफूची गोळी काही वर्षांपूर्वी म्हणजेच पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी एका जोडप्याला कमीत कमी चार पाच अपत्य असायची आणि तो काळ लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने भरभराटीचा होता. त्याकाळी लोकसंख्या वाढीवर भरपूर बोललं, भरपूर लिहील जायचं आणि लोकसंख्या वाढीचा सगळ्या जगाने धसका घेतला होता. त्यात भारत अव्वल स्थानी होता .लोकसंख्येच्या भरमसाट वाढीत स्त्रीला कामही भरपूर असायचे . त्याकाळी आजच्या सारख्या भौतिक सुविधा उपलब्ध नसायच्या. स्त्रीला पहाट पासून सगळ्यांच्या खाण्यापिण्याच्या तयारीसाठी जात्यावर दळण दळावं लागायचं . उखळात कुटावं लागायचं . भल्या मोठ्या कुटुंबातील सगळ्यांच्या जेवणावळीचा भार स्त्रीवर असायचा. याच बरोबर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून शेतातले काम करावं लागायचं. भरीस भर म्हणून एकेका वर्षाच्या अंतराने मुलांना जन्माला घालणं. हे इतिकर्तव्य इच्छा असो, नसो पार पाडावी लागायची आणि त्यात मुलींचीच भर पडत चालली तर विचारायलाच नको. स्त्रीला इतके लेकरं सांभाळून घरकाम करणे शक्य व्हायचं नाही. म्हणून ती माता पोटच्या गोळ्याला झोपी लावून अंगावरच्या कामाचा भार हलका करण्याचा प्रयत्न करायची. पण लहानग्यांच्या रडण्याचा मुलभूत अधिकार सहजासहजी हिरावून घेऊ शकत नव्हती. परंतु त्या मातेला आपल्या गोळ्याला शांत करणे गरजेचेच होते. मग त्या मातेला आपल्या पोटच्या गोळ्याला शांत करण्याचा पर्याय म्हणून अफूच्या डोसचा पर्याय स्वीकारणं क्रमप्राप्त ठरलं . अफूच्या डोसने बाळ गुंगी येऊन निपचित पडून शांत व्हायचं, झोपी जायचं आणि त्या मातेला ममता बाजूला सारून कामाशी एकनिष्ठ व्हावं लागायचं. मग त्या अफूच्या डोसची लहानग्यांना सवय जडली. तत्कालिन काळातील लेकरांप्रमाणे आज ही बाळाला शांत करण्यासाठी डोस द्यावा लागतोच. पण डोसचा प्रकार बदलला. अफूच्या ऐवजी मोबाईल नावाचं बोलक यंत्र आलं . बाळाच्या जन्मा पूर्वीपासूनच बाळाला मोबाईल या यंत्राची ओळख झाली आहे. अर्जून पुत्र अभिमन्यू आई सुभद्रेच्या पोटात असताना चक्रव्यूहरचना भेदण्याची कला शिकला.तसच आजचा बाळ मोबाईल नावाचं यंत्र शिकला. बाळ पृथ्वीवर अवतरल्याची चाहूल, जाणीव मोबाईल कानाला लावून त्याचा टाहो आप्त स्वकीयात दुमदुमविला जातो., 'मी आलोय मला एक मोबाईल तयार ठेवा ' आणि बाळ जसजसं वाढत जाईल. तसतसं मोबाईलशी चिकटू लागलं . मोबाईल हिसकावला की मोठमोठ्यानं भोकाड पसरु लागलं. हीच बाळाची नस मातेने ओळखली. मोबाईल हातात असला कि ,बाळ रडत नाही, काही मागत नाही.आपले जेवढे काही काम आहे. तेवढे काम उरकून मोबाईलशी खेळत बसावं . अशी नित्यानेमाची दैनंदिनी होऊन बसली. आईचंही काम उरकू लागलं आणि बाळाला शांत करण्याचा रामबाण उपाय आईला सापडला. बाळ मोबाईल मध्ये गुंग होऊ लागलं. बाळाला मोबाईल शिवाय करमेना. लहानगे मोबाईलच्या आश्वासना शिवाय शाळेत जाईनासे झाले . मोबाईल मध्ये असणारा कोणतातरी खेळ खेळू लागले. मोबाईल मधल्या खेळाची आवड निर्माण झाली. मोबाईल मधील गेमच्या बाळ एवढा आहारी गेला. मोबाईल संमोहित करू लागला आणि मोबाईलने एवढे संमोहन केले, की मोबाईलचा आदेश इतका पाळू लागला. काही गेम तर आत्महत्या करण्याचे आदेश देऊ लागला. मोबाईलच्या आगमनामुळे मैदानं ओस पडू लागली. मैदानी खेळ खेळण्याचा आनंद कोसो दूर तर गेलाच. पण मैदानी खेळाची नावं सुद्धा आठवेनाशी झाली. याचा परिणाम शरीरावर होऊ लागला . डोळ्यांच्या बुबळांनी दिशा बदलली. मोठमोठ्या भिंगाचे चष्मे डोळ्यावर दिसू लागली. मोबाईल यंत्रात परिपूर्ण होऊ लागलेला बालक स्मरणशक्ती कमी करू लागला. त्याचं पूर्ण जग मोबाईलमय होऊन बसले. बाळ मोबाईलचा मानसिक गुलाम झाला.मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे एकाग्रतेचा अभाव होतो. शारीरिक तसेच मानसिक ताण पडतो. मी कसा दिसतो , याचं पुन्हा पुन्हा दर्शन होत राहिलं. मग सेल्फी सारखा प्रकार पुढे येऊन जास्तीत जास्त व्यक्ती सेल्फीश बनत गेली. सेल्फीच्या नादात कधी कधी जीवही धोक्यात घालून ,जीव गमवावा लागला . मोबाईल मध्ये बघत स्वतः च हसत राहिला. मोबाईल शिवाय जीणं अशक्यप्राय होऊन बसलं . मोबाईल मधील वेळेच्या गुंतवणुकी बरोबर आर्थिक गुंतवणूक ही होऊ लागली. भल्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ लागले .मग आर्थिक नुकसान डोक्यात घर करू लागलं आणि मती गुंग होऊन आत्महत्या सारखे प्रकार होऊ लागले. एका सर्वेक्षणात असे आढळून आले,की महाराष्ट्रातील जवळपास सव्वा लाख लहान मुलांचे डोळे आळशी बनले आहेत. या मुलांना amblopiya (अंबलोपिया) नावाचा डोळ्याचा आजार झाला आहे. दृष्टीदोष निर्माण झाला. मोबाईल, टीव्ही आणि टॅबच्या प्रकाशामुळे लहान मुलांमध्ये हा दृष्टीदोष वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलं व्हिडिओ गेम्स खेळण्यात पारंगत आहेत. हे गेम खेळताना मुले एवढी रममाण होतात ,की भोवतालचा त्यांना विसर पडतो. याच बरोबर तासनतास मोबाईलचा वापर केल्याने पाठीचे,मानेचे ,मणक्याचे आजार उद्भवू लागले आहेत. मोबाईल फोनद्वारे जे इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन ( ईएमएफआर) निघतात.त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. हे रेडिएशन लहान मुलांच्या मेंदूसाठी फारच हानिकारक ठरतात. मानव भौतिक सुविधेच्या नादापायी स्वतःच्या शरीराची, आरोग्याची हेळसांड करू लागला आहे. आता ह्या अफूच्या गोळीला वेळीच लगाम घातला पाहिजे.तर आणि तरच आरोग्य आणि मानसिक आरोग्य लाभेल.