Wednesday, 22 December 2021

गणित दिवस

 " दैनंदिन जीवन आणि गणित "                                                    

       भारतीय  गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी, दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस 'राष्ट्रीय गणित दिन' म्हणून साजरा केला जातो. 2012 साली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा दिवस 'राष्ट्रीय गणित दिवस' म्हणून जाहीर केला. अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी कोईमतूर च्या इरोड गावात झाला. त्यांच्या आईचे नाव कोमलताम्मल आणि वडिलांचे नाव श्रीनिवास अयंगार होते. त्यांच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब कुंभकोणम मध्ये गेले. जेथे त्यांच्या वडिलांनी  एका कपड्याच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली.

         त्याचवेळी रामानुजन यांना त्या काळातील जगप्रसिद्ध ब्रिटिश गणितज्ञ जी. एच. हार्डी यांच्या कार्याविषयी माहिती मिळू लागली. 1913 मध्ये रामानुजन यांनी आपले काही कामे हार्डी यांना पत्राद्वारे पाठवली. परंतु सुरुवातीला हार्डी यांनी रामानुजन यांच्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. काही काळानंतर रामानुजन यांना केंब्रिजला बोलावणे आले. हार्डी यांच्या मार्गदर्शनात रामानुजन यांनी स्वतःचे 20 संशोधन पेपर्स प्रकाशित केले. 1916 मध्ये रामानुजन यांनी केंब्रिज येथून विज्ञान पदवी प्राप्त केली आणि 1918 मध्ये ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले. ब्रिटनच्या थंड हवामानात 1917 मध्ये त्यांना टीबी झाला होता. त्यातच त्यांची प्रकृती खालावली आणि ते भारतात परतले 26 एप्रिल 1920 रोजी वयाच्या 34 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांची रामानुजन संख्या असलेली 1729 म्हणजे सर्वात लहान अशी संख्या आहे,की दोन संख्याच्या घनांची बेरीज होय ( 1729=12³+1³),(1729=10³+9³) या संख्येलाच रामानुजन संख्या किंवा टॅक्सी कॅब नंबर       म्हणतात.

      विज्ञानामुळे मानवाची प्रगती झाली, जीवनमान उंचावले. परंतु विज्ञाना च्या विकासात गणिताचा सहभाग लक्षणीय आहे.

        ' गणित सर्व शास्त्रीय शिव वर्तते वृद्धि हेतवे!'

    आचार्य विनोबाजी म्हणत, मी ईश्वरा नंतर गणितालाच मानतो. ते खरे आहे. ईश्वर सर्वव्यापी, तर गणित सर्वस्पर्शी आहे. म्हणूनच मानवी जीवनात गणिताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे मानसिक व बौद्धिक विकासात गणित महत्त्वाची भूमिका बजावतात. गणितामुळे शिस्तीची सवय लागते, स्मरणशक्ती वाढते, माणूस तर्कशुद्ध विचार करण्यास शिकतो. निरीक्षण व परीक्षणातून काढलेल्या निष्कर्षा वरच विश्वास ठेवतो अंधानुकरण करत नाही. गणिताचा अंतर्भाव विविध विषयांमध्ये तसेच दैनंदिन घडामोडी मध्ये होतो

    मानवी जीवनात गणिताचे महत्व अनन्यसाधारण आहे. गणिता शिवाय अभ्यास म्हणजे प्राणाशिवाय, चेतने शिवाय शरीर,अचेतन सांगाडा.'गणित ही जागतिक भाषा आहे,'  जीवनाची सुरवातच जन्मापासून होते. जन्मल्यानंतर त्याची जन्मवेळ, दिनांक, वजन याची नोंद केली जाते. अशाप्रकारे माणसाच्या आयुष्यात गणिताचा शिरकाव होतो. जन्मतारीख त्याच्यासाठी स्थिरांक असतो. पण वय मात्र वर्षागणिक बदलत जाते. म्हणजे वय हे प्रचल असते. 

        गणितातील काही नियम,सूत्रे आपण नियमित वापरत असतो.पण आपल्याला तो नियम माहीत नसतो. खेड्यात स्वयंपाक चुलीवर  करतात. चुलीच्या वरच्या भागावर तीन उंचवटे असतात. त्यावर ठेवलेला तवा अथवा भांडे अजिबात हलत नाही, डूगडुगत नाही. यात भूमितीतील एक सिद्धांत लपलेला आहे.

     'तीन नैकरेषीय बिंदूतून एक आणि एकच प्रतल जाते.'

       भाजी बनवायची झाल्यास, भाजी करताना तिखट, मीठ ,पाणी किंवा इतर पदार्थ योग्य प्रमाणात नाही टाकले, तर भाजी बेचव होऊ शकते. बांधकाम करताना सिमेंट,वाळू यांचे योग्य प्रमाण असावेच लागते. येथे गणितातील प्रमाण ही संकल्पना लागू पडते. घराचे बांधकाम करताना थोर गणिती पायथागोरस यांच्या प्रमेयाचा वापर करून भिंती बांधाव्या लागतात पिलर जमिनीशी लंब असतात. अन्यथा भिंती किंवा पिलर एका बाजूला झुकतील आणि घर पडण्याचा धोका उद्भवू शकतो. मरणानंतरही या सूत्राचा वापर थडगं बांधण्यासाठी करावाच लागतो. हे बांधकाम करणाऱ्या किंवा पायथागोरसचे कधी नाव ऐकले किंवा घेतले नसेल अशा गवंड्याला ही माहित नसते. की आपण पायथागोरसचे प्रमेय वापरतो परंतु हे बांधकाम क्षेत्रात,तसेच मैदान तयार करण्यास वापरावेच लागते. फरशी किती लागेल,हे क्षेत्रफळ काढून ठरवावे लागते. तर एखादा पाण्याचा हौद बनवायचा असेल, तर त्याला लांबी, रुंदी, उंची योग्य प्रमाणात घेऊन आपल्याला हवा त्या क्षमतेचा हौद बनवून घ्यावा लागतो. तसेच घर बांधकाम करताना घर आणि घराचा 3D फोटो, देशाचा नकाशा आणि देश, स्वतःचा फोटो आणि स्वतः अशा बऱ्याच बाबी  परस्परांशी साम्य दर्शवतात यात गणितातील समरूप संकल्पना दडलेली असते धरणाची भिंत खालच्या बाजूला जड व वरती कमी जाड असते.द्रवाच्या दाबाचा येथे विचार केला जातो.

         काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर एक विनोदाच्या नावाखाली ,मी एवढा शिकलो, तेवढा शिकलो .पण sin, cos, tan यांचा कुठे वापर करायचा, हे अजूनही कळले नाही.असे एक अज्ञान फिरत होते.पण ते काय शिकले याचा त्यांना तरी मेळ लागतो का ? ही फार मोठी संकल्पना आहे.या त्रिकोणमिती चा वापर करून दोन ग्रहामधील अंतर, तारे ग्रह यामधील अंतर, मनोऱ्याची उंची इत्यादी मोजण्यासाठी आणखी बऱ्याच ठिकाणी उपयोग होतो. कुठल्या गल्लीत ,कितव्या क्रमांकावर घर आहे.याचा  शोध घेण्यासाठी निर्देशक भूमिती या संकल्पनेचा उपयोग केला जातो. नाणेफेक,लकी ड्रॉ  संभाव्यता या संकल्पनेतील आहे. संगीतातील ताल,सुर,लयबद्धता यात ही गणित आहे.जीवनातील प्रत्येक क्षणी गणित उपयोगी पडते.

     एका प्रख्यात कवीच्या सांग सांग भोलानाथ या बालगीतात एक अजाण, निष्पाप बालक भोलानाथला म्हणतो. 'भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर'. 

   यातील गमतीचा भाग सोडला तरी यावरून एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे लहानपणापासून बालकांच्या मनातील गणिताची भीती आणि बालपणापासून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या गणित विषयाचा आपल्या जीवनाशी जो अतुट संबंध, नाते आहे. ते बिंबवण्यात आपण कमी पडतो आणि गणित विषय अवघड समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. पर्यायाने गणित हा विषय कच्चा राहतो.हेच जर साध्या साध्या संकल्पनेतून म्हणजे भाकरी अर्धी केली किंवा चतकोर केली म्हणजे यातून अपूर्णांक स्पष्ट करता येईल.पण तसे होताना दिसत नाही आणि गणिताचा समावेश अवघड विषयात करून ,आपण त्यातून पळ काढतो.परंतु गणित एक खेळ आहे आणि गणिता कडे खेळ या भावनेने बघून ,गणिती खेळ सातत्याने खेळत राहिल्यास गणिता सारखा सोपा,चांगला 

,मनोरंजक  खेळ दुसरा होऊ शकत नाही. गणित सोडवताना मेंदूला मिळणारी चालना आणि गणित सोडवून मिळणारा आनंद ,दुसऱ्या विषयातील घोकम पट्टीमध्ये नक्कीच नाही.