माॅडेल School
मुख्यपृष्ठ
- मुख्यपृष्ठ
- आमच्या विषयी
- संपर्क
- Facebook page
- उपक्रम
- गणित कोडे
- विज्ञानाचे प्रयोग
- photo Gallery
- युट्युब चॅनल व्हिडीओ
- वर्तमानपत्रातील बातम्या
- विविध उपक्रमांची व्हिडीओ
- आमची काही प्रकाशने
- शाळेला मिळालेले मान सन्मान
- किशोर मासिक
- बालभारती ई-पाठय पुस्तके
- गणितविषयक उपयोगी
- दिनविशेष
- लेख
- जीवन शिक्षण मासिक
- Online test (Quiz)
- शैक्षणिक उपयुक्त apps
- शिकू आनंदे उपक्रम
- Other
- उपक्रमाचे Vedio
��स्वागत !!!��
Friday, 16 June 2023
Wednesday, 14 December 2022
मोबाईल : अफूची गोळी
Saturday, 20 August 2022
फिनलंड शिक्षणात जगात भारी
फिनलंड शिक्षणात जगात का भारी
मित्रांनो आपण यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतोय. या वर्षीचा स्वातंत्र्यदिन सर्व भारतीयांसाठी एक आनंदाचा व अभिमानाचा सोहळा आहे. यानिमित्ताने देशाच्या उत्कर्षासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या शैक्षणिक क्षेत्राचे गेल्या ७५ वर्षाचे सिंहावलोकन करणे एक सुजाण नागरिक म्हणून अत्यंत आवश्यक वाटते. ७५ वर्ष उलटूनही अजूनही आपण आपल्या देशातील सर्व बालकांना मोफत व दर्जेदार शिक्षण देवू शकलो नाहीत याची एक भारतीय म्हणून खंत वाटते. अनेक बाबी अद्ययावत करणे सहज शक्य होते परंतु आपण जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले. आपण भारतीय जाती-धर्माच्या राजकारणामध्ये पूर्ण गुरफटून गेलो आहोत. थोर स्वातंत्र्य सेनानींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश खऱ्या अर्थाने लोकशाही गणराज्य होईल असा विश्वास त्यांना वाटला असावा. परंतु मित्रांनो आपण खरचं स्वातंत्र्य उपभोगत आहोत का? असा प्रश्न मनाला पडतो. आजही आपण सर्वजण राजकीय गुलामगिरीत आहोत असे मला वाटते. यामुळे आपला देश प्रगतीच्या दिशेने अतिशय संथगतीने प्रवास करत आहे. स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष होऊन देखील अजूनही आपण विकसनशील देशाच्या यादीमध्ये आहोत. रोजगारनिर्मिती, लोकसंख्यावाढ, प्रदूषण, गरीबी, सीमावाद ही आपल्या देशासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. ह्या सर्व आव्हानावर मात करण्याचं सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे. जोपर्यंत आपण शिक्षणाला प्राधान्य देऊन आपल्या बजेट मध्ये भरीव अशी तरतूद करत नाहीत, नवनवीन तंत्रज्ञान व नवनवीन शिकण्याची व शिकवण्याची तंत्रे स्वीकारत नाहीत, शिक्षणामध्ये सर्व बालकांना समान संधी देत नाही, तोपर्यंत देशातील सरकारी शाळा व त्या शाळेतील विद्यार्थी खऱ्या अर्थाने सक्षम होणार नाहीत व तो पर्यंत आपला देश प्रगत राष्ट्र होऊ शकत नाही. भारतात शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आपल्याला दिसतं. नर्सरी पासून पालकांना पाच हजार ते दोन लाखापर्यंत फी आकारली जाते. विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण होईपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च होतात. अन हे सर्व पैसे शिक्षणसम्राटांच्या खिशात जातात. विद्यार्थी व पालक दोघेही कर्जबाजारी होतात. एवढं सगळं कर्ज डोक्यावर असल्यावर या देशाच्या पिढीकडे सामाजिक भान असण्याची व त्यांनी देशाची सेवा करण्याची अपेक्षा आपण त्यांच्याकडे काशीकाय ठेवू शकतो? खरं तर शिक्षण व आरोग्य सेवा ही कोणत्याही राष्ट्राचा कणा असतो. जगातील जे प्रगत राष्ट्र आहेत त्या देशातील सर्व बालकांना प्राथमिक व उच्चप्राथमिक शिक्षण मोफत व दर्जेदार मिळते. या प्रगत राष्ट्रांमध्ये जवळपास सर्व शाळा सरकारीच आहेत व शिक्षणात अजिबात खाजगीकरण झालेले नाही. हे देश शिक्षण क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून नाही तर राष्ट्र विकासाचे साधन म्हणून याकडे पाहतात. यामुळे हे देश शिक्षणाच्या व पर्यायाने विकासाच्या बाबतीत जगात अव्वल आहेत. कोणत्याही देशासाठी आपल्या देशाच्या शिक्षणातील गुंतवणूक ही देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. आज आपण असाच एक देश पाहणार आहोत ज्यांच्या शिक्षण पध्दतीचा आदर्श संपूर्ण जगाने घ्यावा असे तेथील शैक्षणिक वातावरण आहे. केवळ शिक्षणाच्या जोरावर या देशाने उत्तुंग झेप घेतलेली आहे.
जगाच्या पाठीवर फिनलंड हा एक असा देश आहे ज्यामध्ये १९४७ मध्ये म्हणजे आपला देश स्वातंत्र्य झाला तेव्हा जंगलाच प्रमाण जास्त होतं. देशाला पुढे न्यायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे या देशाने जाणलं. अन त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज हा देश सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणात जगात अव्वल आहे. जगातील सर्वांत आनंदी देश फिनलंड आहे. गुणवत्तेमध्ये जगात अव्वल आहे. या देशाची लोकसंख्या फक्त ५५ लाख आहे. यावरुन फिनलंड किती चिमुकला देश आहे, याची कल्पना येते. इथली शिक्षण व्यवस्था जगातली सर्वांत चांगली मानली जाते. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनाही त्याने मागे टाकले आहे. फिनलंड शंभर टक्के साक्षर देश आहे. इथले विद्यार्थी जगात सर्वांत जास्त हुशार विद्यार्थी म्हणून गणले जातात. त्यांच्यात नापास होण्याचं प्रमाण जवळ जवळ शून्य असतं. पीआयएसए PISA (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट) नावाची संस्था जगातल्या १५ वर्षांच्या शिकणाऱ्या मुलांचं गणित, विज्ञान आणि इतर विषयांच्या अनुषंगानं परीक्षण करते, तर त्या संस्थेच्या निकषांत फिनलंडचे विद्यार्थी कायम सर्वोच्च स्थानी असतात.
या देशामधील मुलांचं शिक्षण हे ७ वर्ष पूर्ण झाल्यावर सुरू होतं अन तेही अगदी मोफत. या देशात बालकांसाठी ७ वर्षाअगोदर कोणत्याही प्रकारची शाळा या देशात उपलब्ध नाही. ७ वर्षाअगोदर शाळेत पाठवणे हा या देशात ‘गुन्हा’ समजला जातो. या देशामध्ये जवळपास सर्व विद्यार्थी हे सरकारी शाळेत शिकतात. फिनलंड मध्ये शहरी व ग्रामीण शाळांतील सुविधा व शिक्षणाच्या दर्जामध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही. शहरी व ग्रामीण शाळेत समान दर्जाचे शिक्षण दिले जाते. येथे प्रत्येक २० विद्यार्थ्यां मागे एक शिक्षक असतो. एका वर्गात २० च विद्यार्थी असतात. फिनलंड मध्ये विद्यार्थी सरासरी शिक्षक गुणोत्तर १४:१ असे आहे तर भारतात हेच गुणोत्तर ३५:१असे आहे. इयत्ता १ ली पासून ६ वी पर्यंत एकच शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो. ६ वी ते ९ वी ला विषय शिक्षक असतात. दिवसाची एकूण ८ तास शाळा असते त्यात प्रत्येक तास हा ६० मिनिटांचा असतो त्यात १५ मिनिटे छोटी सुट्टी असते. प्रत्येक बालकाने आठवड्याला किमान २० तास शाळेत येणे आवश्यक असते. शाळेची वेळ सोमवार ते गुरुवार सकाळी ९:४५ ते ५ अशी असते. शुक्रवारी अर्धा दिवस शाळा तर शनिवार व रविवारी पूर्ण दिवस सुट्टी असते. या विद्यार्थ्यांना दररोज अगदी थोडा गृहपाठ दिला जातो जो फक्त अर्ध्या तासात पूर्ण होतो. येथील प्रत्येक विद्यार्थ्यांना सरकारकडून टॅबलेट दिला जातो त्यात इन्ट्रॅक्टइव्ह बेस अभ्यासक्रम भरलेला असतो. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके शाळेत घेऊन यावे लागत नाही. इतर आवश्यक पुस्तके व वह्या लेखन साहित्य शाळेत प्रत्येक वर्गखोलीत ठेवलेले असते. दुपारचे जेवण अतिशय दर्जेदार, वैविध्यपूर्ण व सकस असते. ते विद्यार्थ्यांना हवे तेवढे मिळते. १ ली ते ९ वी पर्यंत विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही. सर्वंकष व सातत्यपूर्ण मूल्यमापन सारखी पद्धती प्रभावीपणे सर्वांगीण मूल्यमापनासाठी वापरली जाते. विद्यार्थ्यांना या मूल्यमापन पद्धती अंतर्गत मिळालेले गुण कोठेही शेअर केले जात नाहीत तर ते शासनस्तरावर फक्त विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विचारात घेतले जातात. जास्तीत जास्त ज्ञानरचनावादी पध्दतीने अध्यापन केले जाते. फक्त शिक्षकांनी अध्यापन करून शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या स्वतः शिकण्यावर जास्त भर दिला जातो. शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध या सारख्या कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परिक्षांना या देशात अजिबात थारा नाही. त्यामुळे वर्गात विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये व पालकांमध्ये ईर्ष्या किंवा नैराश्य हे कधीच वाट्याला येत नाही. येथे शिक्षक व विद्यार्थी स्वतः शी च स्पर्धा करताना दिसतात ज्यामुळे त्यांची प्रगती ही कोणत्याही दडपणाशिवाय व पोपटपंची न करता होते. येथे विद्यार्थ्यांचा शाश्वत विकास करण्यावर जास्त भर दिला जातो. ( जसे वक्तृत्व, गायन, अभिव्यक्ती, संवादकौशल्य, नवनिर्मिती, तार्किकता) वर्गातील बौद्धिक क्षमतेच्या अभावामुळे किंवा विशेष गरजामुळे मागे राहिलेल्या बालकांना विशेष शिक्षकांची शासन सोय करून त्यांना इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणले जाते. या देशात हुशार विद्यार्थ्यांपेक्षा जे विद्यार्थी अध्ययन क्षमतामध्ये मागे आहेत त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते. यामुळे या देशात एकही बालक अप्रगत राहत नाही.
या देशात वयाच्या १६ व्या वर्षांपर्यंत शिक्षण अगदी मोफत आहे, अन सरकारला त्यानंतर सुद्धा सामान्य शिक्षण व व्होकेशनल शिक्षण हे अगदी मोफत द्यावे लागत फक्त पालकांना प्रवासाचा खर्च करावा लागतो. विशेष म्हणजे या देशात वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही. १६ व्या वर्षानंतर देशातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मेट्रिकलेशन टेस्ट द्यावी लागते जी सर्वांना बंधनकारक नसते. १६ वर्षानंतर सुद्धा व्होकेशनल शिक्षण व सर्वसामान्य शिक्षण असे दोन भाग पडतात. व्होकेशनल शिक्षणासाठी ही टेस्ट देणें गरजेचे नाही पण सामान्य शिक्षणासाठी( ग्रॅज्युएशन, पदविका, इ.) ही टेस्ट देणे गरजेचे आहे. या देशात शिक्षक बनने हे येथील तरुणांसाठी एक स्वप्न असतं. कारण तेथे शिक्षकांना खूप सन्मान दिला जातो. येथे शिक्षक होण्यासाठी अतिशय खडतर परीक्षा द्यावी लागते. शिक्षक होण्यासाठी तरुणांना या देशात पाच वर्षांचा मास्टर डिग्री कोर्स पूर्ण करावा लागतो. शिक्षक म्हणून निवड करताना अभ्यासू वृत्ती, कल्पकता, ज्ञान, नाविन्याची ओढ व विद्यार्थ्यांशी वागण्याचा स्वभाव हा फार कटाक्षाने तपासला जातो. शिक्षकांना या देशात अनेक अधिकार दिलेले असतात. शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त कोणतेही काम लावली जात नाहीत. शिक्षकांच्या प्रयोगशीलतेला कमालीचे प्राधान्य दिले जाते. शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शकांच्याकडून उत्कृष्ट दर्जाची नियमित प्रशिक्षणे दिली जातात ती लादली जात नाहीत. शिक्षकांना आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ कधीच या देशात येत नाही. मित्रांनो कोणत्याही तरुणाला जर अशा देशात शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर कोणाला आवडणार नाही? आपल्या देशात मात्र परिस्थिती वेगळी आहे. ‘मागता येत नाही भीक, तर मास्तरकी शिक’ अशी परिस्थिती आपल्या देशात आहे. त्यामुळे प्रतिभावान तरुण या क्षेत्रात येण्यासाठी अजिबात इच्छुक नाहीत. आपल्या देशात शिक्षक होण्यासाठी सरकारी व खाजगी यंत्रणेत प्रचंड भ्रष्टाचार होतो हे सर्वश्रुत आहे. परिस्थितीमुळे नाईलाजाने काही प्रतिभावान तरुण या क्षेत्रात येतात. इष्ट बदलाच्या दृष्टीने नवनवीन प्रयोग करतात. पण अशा प्रयोगशील व नाविन्याचा ध्यास असणाऱ्या शिक्षकांना ‘गुन्हेगार’ ठरवले जाते, त्यांना व्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातात जे शिक्षणक्षेत्रात आवश्यक इष्ट बदलाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या वेळी आपण तरुणांमधील क्रमांक एकची प्रतिभा या क्षेत्रात आणू त्यावेळी नक्कीच या क्षेत्रात आमूलाग्र बदल दिसतील यासाठी नागरिकांनी सजग राहायला हवं व सरकारने यादृष्टीने पाऊले उचलायला हवीत.
आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणात सर्व बालकांना समान संधी व सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक वाटते. असे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण हे आपल्या देशातील प्रत्येक बालकाला मिळायला हवे, तेव्हा अन तेव्हाच आपला देश डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील देश बनेल असा विश्वास वाटतो. नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अनेक आधुनिक अध्यापन पद्धतींचा व नवनवीन बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे हे शैक्षणिक धोरण नक्कीच देशाच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती करेल असा विश्वास वाटतो. फक्त या धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हायला हवी. हे धोरण प्रभावीपणे राबवण्यासाठी आपण सर्वांनीच एक सुजान नागरिक म्हणून प्रयत्नशील राहून देशाला प्रगत राष्ट्र बनवण्यासाठी ज्या ज्या चांगल्या बाबी इतर प्रगत देशांमध्ये राबवल्या जात आहेत त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या सरकारकडे आग्रही असणे अत्यंत गरजेचे आहे. यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करतोय अन तो करायलाही हवा. हा एक आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. पण हा उत्सव तेव्हा आणखी आनंदाने साजरा करता येईल जेव्हा आपण आपल्या देशातील प्रत्येक बालकाला मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकू. सर्व बालकांना शिक्षणात समान संधी देऊ शकू. अन मला विश्वास वाटतो की आपण सर्वांनी जर मनापासून प्रयत्न केला, प्रत्येकाने काही ना काहीतरी योगदान शिक्षणक्षेत्रासाठी दिले त्यातून देशातील प्रत्येक बालकाला मोफत व दर्जेदार शिक्षण मिळाले तर नक्कीच आपण एक भारतीय म्हणून स्वातंत्र्याचा शतक महोत्सवी सोहळा आपण मोठ्या आनंदाने व अभिमानाने साजरा करू शकतो, असा ठाम विश्वास वाटतो.
--------------------------------------------
Saturday, 16 July 2022
ओढाताण
ओढाताण
दसरा झाला आणि ऊसतोडणी साठी कारखान्याकडे
जाण्याची लगबग सुरू झाली. आता मराठवाड्यातील गावच्या गाव निर्मनुष्य आणि भकास वाटू
लागलीत. असाच एक भागवत आणि सीता यांचा कुटुंब
कबिला. ऊसतोडणी साठी कारखान्यावर चालली होती.
पावसाची रिपरिप चालू होती. पडत्या पावसात भागवत आणि सीताचा संसार ट्रॅक मध्ये भरला
जात होता. पावसात बी जीवाला आराम नव्हता ,की कसलं थांबणं नव्हत. सीता म्हणायची."
आता कसला आलाय आराम ? आता आराम मारतीच्या मागं,
मसनवट्यातच." सीताला परिस्थितीनं पिळवटून टाकलं होतं. जवळपास अर्धा वर्ष परमुलखात वास्तव्य करायचं होतं.
म्हणून सीतानी जोपर्यंत रहावा लागंल ,तोपर्यंत लागणारं तिखट ,मीठ इथूनच घेतलं होतं.
तिथं कुठं एका जागेवर बस्तान बसवायचं होत? कुठंही मुक्काम करावा लागतो. 'ईचाचं बिऱ्हाड
पाठीवर' होतं.' 'मसनवटा असूद्या ,नाहीतर विचू काटा असूद्या.' जिथं जागा भेटंल. तिथं
तीन दगडाची चूल मांडून पोटाची खळगी भरावा लागती
.गावाचा वारा जवळपास फिरकणार बी नव्हता. म्हणून इथूनच समदी तजवीज करावी लागती. सगळ्या
तयारीसाठी सीतालाच झटं द्यावं लागत होतं. चटणी कुटून आणणं,दळण- दुळण आणणं, कारखान्यावर
गेल्यावर काय काय लागंल ?याची सगळी यादी सीताच्या तोंडपाठ होती. सीता काय आज पहिल्यांदाच
कारखान्याला चालली नव्हती. तिची पहिली पिढी आणि आता दुसरी पिढी कारखानाच करीत होती.
दोनेक महिन्यापासनं तयारीला लागून लगत वार
लागणारं समदं साहित्य गोळा करून ठेवलं होतं. सातवीत शिकत असलेला आदित्य आणि चौथीत शिकत
असलेला सार्थक , आपापल्या परीने बारीक सारीक
वस्तू, पसारा भरायला आईला मदत करीत होती. सगळ्यात लहान पाच सहा वर्षाची चिमणी, शिवाली
आईच्या पायाशी घुटमळत होती. सीता चिडायची. एकीकडं आईची माया आणि काम दोन्ही
सुटत नव्हतं. दोन्हीत जीव घुटमळत होता. पण माया थोडी बाजूला ठेवून पसारा भराभरी कडे
लक्ष द्यावं लागायचं. लेकरांना वर्षातले अर्धे दिवस आई पासून दूर राहावं लागायचं.लेकरांची
आबाळ व्हायची. पोटुशी असताना मोळ्या वाहिल्या,
कधीही आराम मिळाला नाही. अन लहान लहान लेकरांना
पाचराटात झोपी लावून, ओल्या बाळंतपणात ऊस तोडून, ऊसाच्या मोळ्या वाहिल्या होत्या. नवरा
म्हणणारा भागवत हमेशाच दारू डोसायचा. कारखान्याला ऊस तोडणीचं काम करायचा, ती बी रोज
नशेतच असायचा आणि गावाकडं बी नशेतच असायचा. आजही फुल झिंगला होता. त्याच्यापाशी बऱ्याच जणांचं कोंडाळं जमलं होतं.
कसल्या तरी पैशा वरून हमरी तुमरी चालली होती.कोणीतरी भागवतला गचांडी गुचांडी करत होतं.
हा सगळा हल्लकल्लोळ ऐकून, सिता हातातलं काम सोडून भागवत कडं आली. तर भांडण ऐकून चाटच
पडली होती. भागवतने दोन मुकादमाकडून कारखान्याची उचल घेतली होती आणि दारुपायी घातली
होती. याची थोडीबी कल्पना सीताला नव्हती. आता तो मुकादम माझ्या टोळीत कारखान्याला चल
म्हणून हट्टाला पेटला होता . त्याचं ही खरं होत. त्याच्याकडून ज्या कारणासाठी उचल घेतली
होती. ते कारण भागवतने धुडकावून लावलं होतं. सीता गयावया करत होती. पण मुकादम काही
केल्या ऐकायला तयार नव्हता. काही बाही शिव्या देत होता. अद्वा तद्वा बोलत होता. पण
त्याच्या लक्षात आलं, जास्तीचं भांडून काही
उपयोग होणार नाही. आपले पैसे तरी काढून घ्यावेत, "मग माझे पैसे आत्ताची आत्ता
द्या, तरच जाऊ देतो. नाहीतर भाग्या हरामखोराला उचलून नेतो." म्हणायचा. आता सीताला
थोडसं हायसं वाटलं. याचे पैसे देऊन सध्याचा रस्ता मोकळा करता येईल. सीतानी दुसऱ्या
मुकादमा हातापाया पडून, गयावया करून त्याच्याकडून पैसे घेऊन पहिल्या मुकादमाचा व्यवहार
मिटविला आणि सिताचा जीव सध्या तरी भांड्यात
पडला. अन् सीता पुन्हा आपल्या कामाला जुपली. सीता कामाकड वळत नाही, तोच पुन्हा भागवत
जवळ गलका सुरू झाला. एका समस्येतून मार्ग निघत नाही, तोच आता अजून काय समस्या उभी राहिली
? बघते तर काय ! भागवतनी दुकादारांकडून केलेल्या उधाऱ्या, लोकांकडून घेतलेले हात उसने
,काही सावकारांचे बेभावाने घेतलेली कर्जाऊ रक्कम,आता सहा महिने आपल्याला आपले पैसे
मिळणार नाहीत. म्हणून भागवत भोवती कोंडाळं केलं होतं. पुन्हा सीता गयावया करीत होती
.कसा का असंना कुंकवाला धनी होता. म्हणून पुन्हा
पहिला पाढा गिरवित काहींचे निमे अर्धे पैसे देऊन, पुन्हा आपल्या कामाला लागली.
सगळा पसारा पूर्ण भरल्यावर सीतानी नवऱ्याला
ओढीतच ट्रकमध्ये कोंबलं. आपल्या लेकरांना दाटल्या कंठानी समजून सांगत होती.
" हे बघ पिल्या, सार्थक ,शिवालीकडं लक्ष
देत जा. त्यांना काय पाईजे, काय नकु बघत जा. तु मोठा हाईस. हिरी- बारवाकडं जात जाऊ
नका. आजीचं ऐकत जा. आजीने सांगितलेली कामं करत जा " सांगताना दाटलेला कंठ , हुंदक्या
सरशी मोकळा झाला. आपल्या पिलांना पदराखाली घेऊन रडू लागली. काही केल्या रडु आवरता येत
नव्हतं . तिच्या मोरं सगळं वर्तमान आणि भविष्य उभा राहत होतं. व्यसनी नवऱ्या बरोबरचा
संसार, रानाची मशागत , लेकरांचे शिक्षण. शेत हाई म्हणायला हाई, त्यानं काही 'पुरंना
बी अन् उरंना बी' अशातली गत. कारखान्याला गेलं, तर हाई तेवढं रान पडाक पडायचं .लेकरं
वणवण व्हायची . गेल्या शिवाय जगणं होत नव्हतं. अशी तारेवरची कसरत सीताला करावा लागत
होती. अशी 'ओढाताण ' लग्न झाल्यापासून चालू
होती आणि नवऱ्याने दारू नाही सोडली, तर आयुष्यभर राहणार होती.
Wednesday, 22 December 2021
गणित दिवस
" दैनंदिन जीवन आणि गणित "
भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी, दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस 'राष्ट्रीय गणित दिन' म्हणून साजरा केला जातो. 2012 साली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा दिवस 'राष्ट्रीय गणित दिवस' म्हणून जाहीर केला. अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी कोईमतूर च्या इरोड गावात झाला. त्यांच्या आईचे नाव कोमलताम्मल आणि वडिलांचे नाव श्रीनिवास अयंगार होते. त्यांच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब कुंभकोणम मध्ये गेले. जेथे त्यांच्या वडिलांनी एका कपड्याच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी रामानुजन यांना त्या काळातील जगप्रसिद्ध ब्रिटिश गणितज्ञ जी. एच. हार्डी यांच्या कार्याविषयी माहिती मिळू लागली. 1913 मध्ये रामानुजन यांनी आपले काही कामे हार्डी यांना पत्राद्वारे पाठवली. परंतु सुरुवातीला हार्डी यांनी रामानुजन यांच्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. काही काळानंतर रामानुजन यांना केंब्रिजला बोलावणे आले. हार्डी यांच्या मार्गदर्शनात रामानुजन यांनी स्वतःचे 20 संशोधन पेपर्स प्रकाशित केले. 1916 मध्ये रामानुजन यांनी केंब्रिज येथून विज्ञान पदवी प्राप्त केली आणि 1918 मध्ये ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले. ब्रिटनच्या थंड हवामानात 1917 मध्ये त्यांना टीबी झाला होता. त्यातच त्यांची प्रकृती खालावली आणि ते भारतात परतले 26 एप्रिल 1920 रोजी वयाच्या 34 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांची रामानुजन संख्या असलेली 1729 म्हणजे सर्वात लहान अशी संख्या आहे,की दोन संख्याच्या घनांची बेरीज होय ( 1729=12³+1³),(1729=10³+9³) या संख्येलाच रामानुजन संख्या किंवा टॅक्सी कॅब नंबर म्हणतात.
विज्ञानामुळे मानवाची प्रगती झाली, जीवनमान उंचावले. परंतु विज्ञाना च्या विकासात गणिताचा सहभाग लक्षणीय आहे.
' गणित सर्व शास्त्रीय शिव वर्तते वृद्धि हेतवे!'
आचार्य विनोबाजी म्हणत, मी ईश्वरा नंतर गणितालाच मानतो. ते खरे आहे. ईश्वर सर्वव्यापी, तर गणित सर्वस्पर्शी आहे. म्हणूनच मानवी जीवनात गणिताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे मानसिक व बौद्धिक विकासात गणित महत्त्वाची भूमिका बजावतात. गणितामुळे शिस्तीची सवय लागते, स्मरणशक्ती वाढते, माणूस तर्कशुद्ध विचार करण्यास शिकतो. निरीक्षण व परीक्षणातून काढलेल्या निष्कर्षा वरच विश्वास ठेवतो अंधानुकरण करत नाही. गणिताचा अंतर्भाव विविध विषयांमध्ये तसेच दैनंदिन घडामोडी मध्ये होतो
मानवी जीवनात गणिताचे महत्व अनन्यसाधारण आहे. गणिता शिवाय अभ्यास म्हणजे प्राणाशिवाय, चेतने शिवाय शरीर,अचेतन सांगाडा.'गणित ही जागतिक भाषा आहे,' जीवनाची सुरवातच जन्मापासून होते. जन्मल्यानंतर त्याची जन्मवेळ, दिनांक, वजन याची नोंद केली जाते. अशाप्रकारे माणसाच्या आयुष्यात गणिताचा शिरकाव होतो. जन्मतारीख त्याच्यासाठी स्थिरांक असतो. पण वय मात्र वर्षागणिक बदलत जाते. म्हणजे वय हे प्रचल असते.
गणितातील काही नियम,सूत्रे आपण नियमित वापरत असतो.पण आपल्याला तो नियम माहीत नसतो. खेड्यात स्वयंपाक चुलीवर करतात. चुलीच्या वरच्या भागावर तीन उंचवटे असतात. त्यावर ठेवलेला तवा अथवा भांडे अजिबात हलत नाही, डूगडुगत नाही. यात भूमितीतील एक सिद्धांत लपलेला आहे.
'तीन नैकरेषीय बिंदूतून एक आणि एकच प्रतल जाते.'
भाजी बनवायची झाल्यास, भाजी करताना तिखट, मीठ ,पाणी किंवा इतर पदार्थ योग्य प्रमाणात नाही टाकले, तर भाजी बेचव होऊ शकते. बांधकाम करताना सिमेंट,वाळू यांचे योग्य प्रमाण असावेच लागते. येथे गणितातील प्रमाण ही संकल्पना लागू पडते. घराचे बांधकाम करताना थोर गणिती पायथागोरस यांच्या प्रमेयाचा वापर करून भिंती बांधाव्या लागतात पिलर जमिनीशी लंब असतात. अन्यथा भिंती किंवा पिलर एका बाजूला झुकतील आणि घर पडण्याचा धोका उद्भवू शकतो. मरणानंतरही या सूत्राचा वापर थडगं बांधण्यासाठी करावाच लागतो. हे बांधकाम करणाऱ्या किंवा पायथागोरसचे कधी नाव ऐकले किंवा घेतले नसेल अशा गवंड्याला ही माहित नसते. की आपण पायथागोरसचे प्रमेय वापरतो परंतु हे बांधकाम क्षेत्रात,तसेच मैदान तयार करण्यास वापरावेच लागते. फरशी किती लागेल,हे क्षेत्रफळ काढून ठरवावे लागते. तर एखादा पाण्याचा हौद बनवायचा असेल, तर त्याला लांबी, रुंदी, उंची योग्य प्रमाणात घेऊन आपल्याला हवा त्या क्षमतेचा हौद बनवून घ्यावा लागतो. तसेच घर बांधकाम करताना घर आणि घराचा 3D फोटो, देशाचा नकाशा आणि देश, स्वतःचा फोटो आणि स्वतः अशा बऱ्याच बाबी परस्परांशी साम्य दर्शवतात यात गणितातील समरूप संकल्पना दडलेली असते धरणाची भिंत खालच्या बाजूला जड व वरती कमी जाड असते.द्रवाच्या दाबाचा येथे विचार केला जातो.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर एक विनोदाच्या नावाखाली ,मी एवढा शिकलो, तेवढा शिकलो .पण sin, cos, tan यांचा कुठे वापर करायचा, हे अजूनही कळले नाही.असे एक अज्ञान फिरत होते.पण ते काय शिकले याचा त्यांना तरी मेळ लागतो का ? ही फार मोठी संकल्पना आहे.या त्रिकोणमिती चा वापर करून दोन ग्रहामधील अंतर, तारे ग्रह यामधील अंतर, मनोऱ्याची उंची इत्यादी मोजण्यासाठी आणखी बऱ्याच ठिकाणी उपयोग होतो. कुठल्या गल्लीत ,कितव्या क्रमांकावर घर आहे.याचा शोध घेण्यासाठी निर्देशक भूमिती या संकल्पनेचा उपयोग केला जातो. नाणेफेक,लकी ड्रॉ संभाव्यता या संकल्पनेतील आहे. संगीतातील ताल,सुर,लयबद्धता यात ही गणित आहे.जीवनातील प्रत्येक क्षणी गणित उपयोगी पडते.
एका प्रख्यात कवीच्या सांग सांग भोलानाथ या बालगीतात एक अजाण, निष्पाप बालक भोलानाथला म्हणतो. 'भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर'.
यातील गमतीचा भाग सोडला तरी यावरून एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे लहानपणापासून बालकांच्या मनातील गणिताची भीती आणि बालपणापासून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या गणित विषयाचा आपल्या जीवनाशी जो अतुट संबंध, नाते आहे. ते बिंबवण्यात आपण कमी पडतो आणि गणित विषय अवघड समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. पर्यायाने गणित हा विषय कच्चा राहतो.हेच जर साध्या साध्या संकल्पनेतून म्हणजे भाकरी अर्धी केली किंवा चतकोर केली म्हणजे यातून अपूर्णांक स्पष्ट करता येईल.पण तसे होताना दिसत नाही आणि गणिताचा समावेश अवघड विषयात करून ,आपण त्यातून पळ काढतो.परंतु गणित एक खेळ आहे आणि गणिता कडे खेळ या भावनेने बघून ,गणिती खेळ सातत्याने खेळत राहिल्यास गणिता सारखा सोपा,चांगला
,मनोरंजक खेळ दुसरा होऊ शकत नाही. गणित सोडवताना मेंदूला मिळणारी चालना आणि गणित सोडवून मिळणारा आनंद ,दुसऱ्या विषयातील घोकम पट्टीमध्ये नक्कीच नाही.
Friday, 1 October 2021
लाल बहादूर
लाल बहादूर
27 मे 1964 म्हणजे भारतासाठी एक
काळाकुट्ट दिवस उगवला. या दिवशी सतेज व्यक्तिमत्व असलेले, जगाला
भारताच्या पंचशील तत्त्वाची ओळख करून दिलेले, आणि जगाला
त्यावर विचार करायला भाग पाडून 'अलिप्ततावाद ' ठामपणे स्वीकारून ,आम्ही कुणाचे मांडलीक नाही असे
जगाला ओळख करून देणारं, स्वातंत्र्य चळवळीतील झुंजार नेते,
एक तळपतं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आणि ते व्यक्तिमत्त्व
म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान सर्वांचे लाडके पंडित नेहरू! त्यांच्या अचानक
जाण्याने जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्याचे काम ज्यांनी केलं ते
भारताचे दुसरे पंतप्रधान देशाचा हिरा म्हणजे आवडते व्यक्तिमत्व लाल बहादूर
शास्त्री यांचा आज जन्मदिन म्हणजे जयंती होय.
लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी मोगल सराई येथे झाला. साध्या परिस्थितीत वाढलेले लालबहादूर शास्त्री
म्हणजे देशाच्या एका खेड्यात जन्मलेल्या गरीब घरातील मुलगा होय. पण वैयक्तिक
गुणांच्या सामर्थ्यावर ते सत्तेच्या सर्वोच्च पदावर जाऊन पोहोचले. भारताचे
पंतप्रधान झाले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय व जागतिक घडामोडी मध्ये त्यांनी प्रचंड यश
संपादन केलं लाल बहादूर शास्त्री देशाच्या पंतप्रधानपदी अल्पकाळच होते. परंतु
त्याच काळात भारत-पाक युद्ध झाले व संबंध देशाला त्यांनी प्रेरणा दिली चैतन्याच्या
संजीवनीने अवघा देश सळसळू लागला.
देशभक्तीची भावना प्रत्येक नागरिकाच्या धमन्यातून वाहू लागली. उर्मी उचंबळून आल्या,
शास्त्रीकडे ना घराण्याची पुण्याई,ना
वक्तृत्वाची जादू ,ना छाप टाकेल असे व्यक्तिमत्व; पण त्यांच्यापाशी होता निखळ
पारदर्शी, प्रामाणिकपणा व सचोटी. त्यामुळे कोट्यवधी
भारतीयांची मन त्यांनी जिंकली. शास्त्री यांच्या कारकिर्दीचा काळ भारावून टाकणाराच
होता. परंतु त्यांचे लहानपण फार हलाखीत गेले लालबहादूर अवघ्या दिड वर्षाची असतानाच
त्यांचे वडील शारदा प्रसाद यांचं प्लेगच्या साथीत निधन झाले आणि लालबहादूर व
त्यांच्या घराची बिकट अवस्था सुरू झाली. कारण त्यांनी मागं काहीच पैसाअडका
मालमत्ता जतन करून ठेवला नाही.
वयाच्या बारा वर्षापर्यंत लालबहादूर मोगल
साऱ्याला राहिले 1921 च्या जानेवारीमध्ये महात्मा गांधी बनारसला आले.
त्यांच्या जाहीर सभेला लालबहादूर आपल्या मित्र परिवारासह हजर होते. त्या सभेला
महात्मा गांधी, पंडित मदन मोहन मालवीय यांच्या भाषणाने
प्रभावित होऊन राजकीय चळवळीत पडावं की नाही याची चर्चा होऊन परिणामांची पर्वा न
करता राजकारणात उडी घेण्याचे ठरवले आणि जे. बी. कृपलानी यांच्या हाताखाली काम
करण्याची संधी मिळाली. 1935 मध्ये 'भारत
सरकार कायदा' मंजूर केला. या कायद्याअंतर्गत राज्यात
विधिमंडळ स्थापन करणार, राज्यात जबाबदार सरकार स्थापन करणार
अशी तरतूद होती. या कायद्यान्वये 1937 मध्ये निवडणुका झाल्या
आणि अलाहाबाद मधील एका मतदार संघातून
लालबहादूर निवडून आले. त्यामुळे अलाहाबाद येथील त्यांचा राजकीय पाया आणखी दृढ
झाला.
काँग्रेसने 1941 मध्ये राजकीय चळवळीची नीट आखणी केली व काही निवडक
नेत्यांना वैयक्तिक सत्याग्रह करण्यास सांगण्यात आले त्यात शास्त्रींचा अंतर्भाव
होता. 19 ऑगस्ट 1941 रोजी त्यांना अटक
करण्यात येऊन पाच महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. 1942 च्या
मुंबई येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात 'भारत छोडो'
ठराव मंजूर करण्यात आला. महात्मा गांधी तसेच अनेक नेत्यांबरोबर 19 ऑगस्ट 1942 रोजी शास्त्रींना अटक होऊन तीन वर्ष
कारावासाची शिक्षा झाली. या तीन वर्षाच्या काळात शास्त्रींच्या कुटुंबीयांना खूप
हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या.
24 मार्च 1947 रोजी लॉर्ड माऊंटबॅटन यांचा नवे
व्हॉइसरॉय म्हणून शपथ विधी झाला. स्वातंत्र्य मिळाले, पण
देशाची फाळणी झाली. 1945 मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुका
झाल्या. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक होऊन शास्त्री यांच्या अथक परिश्रमाने
उत्तर प्रदेश विधानसभा काँग्रेस जिंकून
शास्त्री यांना मुख्यमंत्र्याच्या संसदीय सचिव पदी नियुक्ती देण्यात आली.
ते 1951 मध्ये काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस बनले 1952 नंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे व वाहतूक, दळणवळण व वाहतूक, वाणिज्य व उद्योग आणि गृहमंत्री पद
ही पदं भूषवली. शास्त्री कधीही सत्तेमुळे मदांध बनले नाहीत. सत्तेचा त्यांच्यावर
काही परिणाम झाला नाही. आपल्याला मिळणाऱ्या वेतणातच सारा खर्च भागविण्याची त्यांना
सवय होती. 1951 1956 व 1963 त्यांनी
मंत्रिपदाचे राजीनामे दिले. त्यामुळे शास्त्रींचे उत्पन्न घटले. तेव्हा महागड्या
भाज्यांचा वापर त्यांच्या कुटुंबांने बंद केला. एवढेच नव्हे तर शास्त्री स्वतःचे
कपडे स्वतः धुवायचे. 1966 साले शास्त्री यांचा मृत्यू झाला,
तेव्हा त्यांच्यापाशी पैसे, घर जमीन यापैकी
काही नव्हतं. बँकेत रक्कम नव्हती. किंबहुना कुटुंबाच्या वापरासाठी घेतलेल्या जिप
चे पैसे ते हप्त्याहप्त्याने फेडत होते. शास्त्री रेल्वेमंत्री असताना कॉरिडॉर
ट्रेन सुरू झाली.चित्तरंजन येथील रेल्वे
कारखान्याचे उत्पादन वाढलं.तिथं
दरवर्षी 120 ऐवजी 200 इंजिनाचे उत्पादन सुरू झालं. 1962 साली चीनने
भारतावर आक्रमण केलं व देशात आणीबाणी लावण्याचं काम गृहमंत्री या नात्याने
शास्त्री यांच्या वर येऊन पडली.पण त्याचा दुरुपयोग करण्यात आला नाही.तसेच त्यांनी 1963 साली सी. बी. आय.ची स्थापना केली.
पंडित नेहरू यांच्या अकाली निधनानंतर शास्त्री यांच्यावर पंतप्रधानपदाची
जबाबदारी पडली .त्यावेळी त्यांच्या समोर उभ्या
राहिलेल्या समस्या म्हणजे अन्नधान्य टंचाई. म्हणून चौथ्या पंचवार्षिक
योजनेत शेतीला अग्रक्रम दिला भाषिक पेचप्रसंग उभा राहिला तोही मोठ्या शिताफीने
सोडला आणि सर्वात मोठा पेचप्रसंग म्हणजे 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर
लागलेले युद्ध! युद्ध लादण्या मागचा
पाकिस्तानचा होरा असा होता. भारतात नवीन प्रंतप्रधान अधिकार आले होते व त्यांचा
अजून जम बसायचा होता. भारतात अन्नटंचाई सह आर्थिक अडचण, 1962
भारत चीन युद्धात पराभूत झाल्याने भारतातील जनता व लष्कर यांचं नीतिधैर्य खचलं
होतं. भूमी व हवाई दोन्ही आघाड्यावर पाकिस्तानकडे अधिक चांगली शस्त्रास्त्रे होती.
इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून पाकिस्तानने वीगोकोट नजीकच्या सरदार ठाण्यावर 9 एप्रिल 1965 रोजी पहिला हल्ला चढवला सुरवातीला
पद्धतीने व नंतर उघडपणे पाकिस्तान हल्ले करत राहिले पंतप्रधान शास्त्री अस्वस्थ
झाले होते. शास्त्री हे शांततेचे पुरस्कर्ते व समन्वय वादी होते परंतु
त्यावेळी कुरुक्षेत्रावरील अर्जुनाची भूमिका पार पाडावी लागली. 3 सप्टेंबर 1965 रोजी प्रतिहल्ला करण्यास शास्त्रीय
लष्कराला अनुमती दिली आक्रमकांच्या भूमीत जाऊन लढा करण्याचा भारताच्या इतिहासातील
तो पहिलाच प्रसंग होता परंतु पाकिस्तानमधील नागरी वस्त्यांवर हल्ले होणार नाहीत
याची दक्षता घेण्याचे आदेश शास्त्रींनी दिले.
पाकिस्तान ने हल्ल्याचे समर्थन व इतर इस्लामी राष्ट्राचं आपल्याला समर्थन
मिळावा या हेतूने भारतातील मुस्लीम दडपणाखाली जीवन जगत आहेत. अशी आवई पाकिस्तानने
जगभर दिली. परंतु युनो मधील छगला यांच्या भाषणाने पाकिस्तानची पूर्ण बोलती बंद
झाली. छगला स्वतः भारतीय मुस्लीम होते. हे धार्मिक युद्ध आहे. असे दाखवण्याचा पाक
चा हेतू पूर्णपणे फसला. पाकिस्तान ला समर्थन व भारताची दोन्ही पातळीवर कोंडी करणे
चीनने सुरू ठेवलं. चीनने भारताला खलीत्यावर खलीते पाठवायला सुरुवात केली आणि
भारताला उचकावून, एका बाजूला पाकिस्तान दुसर्या बाजूने चीन असा आक्रमण करणे. असा चीन
चा डाव होता." भारतीय फौजांनी आमचा प्रदेश व सार्वभौमत्व यांचा भंग करीत
आहेत. तसेच सिक्कीम हद्दीवर व त्या पलीकडे भारताने बांधलेली लष्करी बांधकाम पाडून
टाकावीत" असा खलिता पाठवला. या घडामोडीत शास्त्रींच्या मुत्सद्देगिरीतील
विनोदाची बारीक किनार होती. "सीमेपलीकडे चीन भारताची बांधकाम पाडून टाका. अशी
मागणी करताना, प्रत्यक्षात भारतीय सैन्याला आपल्या प्रदेशात
येण्याचं आमंत्रणच आपण देत आहोत हे त्यांना उमजले की नाही कोण जाणे!" अशा
मिश्कीलपणे त्यांनी टिपणी केली.
अशा या कठीण प्रसंगी देखील धैर्याने, खंबीरपणे पूर्ण बाबींचा विचार
करणारे, बुद्धिमान दूरदृष्टीचे हेतू व निर्णय यात खंबीर आणि
जबर इच्छाशक्ती असलेले नेते होते. ते स्वप्नात वावरणारे नव्हते, तर वास्तवाचे त्यांना भान होतं. त्यांच्या जबर निर्णय शक्तीचा प्रत्यय 1965 च्या भारत-पाक युद्धात जगाला झाला. त्यांच्या कणखरपणे भारताने युद्ध
जिंकले. यानंतर 9 व 10 जानेवारी 1966 च्या ताश्कंद करार या वेळी भारताचे पंतप्रधान शास्त्री, पाकिस्तानचे अध्यक्ष आयुब खान व रशियाचे अध्यक्ष कोसिजिन यांच्यात अगदी
खेळीमेळीच्या वातावरणात ताश्कंद करारावर सह्या करण्यात आल्या. त्याच रात्री
शास्त्री यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शोक यात्रा विमानतळ
पोहोचली. तेव्हा पाक अध्यक्ष आयुब खान सोव्हिएत नेत्यांसमवेत शास्त्रींना अंतिम
श्रद्धांजली वाहण्यासाठी हजर होते. शवपेटीका स्वतः कोसिजिन व आयुब खान यांनी खांद्यावर
घेतली होती. आदल्यादिवशी युद्धात शत्रू असलेला नेता दुसऱ्या दिवशी जिव्हाळ्याचा
दोस्त बनला व तिसऱ्या दिवशी आश्रू ढाळणारा शवपेटीकेचा वाहक ठरला. असं उदाहरण
जगाच्या इतिहासात क्वचितच असेल. संपर्कात आलेल्या व्यक्तीला मित्र बनवण्याची कला
शास्त्रींच्या स्वभावातच होती. पण असा हा भारताचा 'लाल'
10 जानेवारी 1966 रोजी अनंतात विलीन झाला.
त्यांना भारताचे फार काळ पंतप्रधान पद भूषवता आलं नाही. हे एक दुर्दैवच म्हणावे
लागेल अशा या महान नेत्यास शतशा सलाम!!!