Friday, 1 October 2021

लाल बहादूर

 

लाल बहादूर

       27 मे 1964 म्हणजे भारतासाठी एक काळाकुट्ट दिवस उगवला. या दिवशी सतेज व्यक्तिमत्व असलेले, जगाला भारताच्या पंचशील तत्त्वाची ओळख करून दिलेले, आणि जगाला त्यावर विचार करायला भाग पाडून 'अलिप्ततावाद ' ठामपणे स्वीकारून ,आम्ही कुणाचे मांडलीक नाही असे जगाला ओळख करून देणारं, स्वातंत्र्य चळवळीतील झुंजार नेते, एक तळपतं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आणि ते व्यक्तिमत्त्व म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान सर्वांचे लाडके पंडित नेहरू! त्यांच्या अचानक जाण्याने जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्याचे काम ज्यांनी केलं ते भारताचे दुसरे पंतप्रधान देशाचा हिरा म्हणजे आवडते व्यक्तिमत्व लाल बहादूर शास्त्री यांचा आज जन्मदिन म्हणजे जयंती होय.                

         लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी मोगल सराई येथे झाला. साध्या परिस्थितीत वाढलेले लालबहादूर शास्त्री म्हणजे देशाच्या एका खेड्यात जन्मलेल्या गरीब घरातील मुलगा होय. पण वैयक्तिक गुणांच्या सामर्थ्यावर ते सत्तेच्या सर्वोच्च पदावर जाऊन पोहोचले. भारताचे पंतप्रधान झाले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय व जागतिक घडामोडी मध्ये त्यांनी प्रचंड यश संपादन केलं लाल बहादूर शास्त्री देशाच्या पंतप्रधानपदी अल्पकाळच होते. परंतु त्याच काळात भारत-पाक युद्ध झाले व संबंध देशाला त्यांनी प्रेरणा दिली चैतन्याच्या संजीवनीने  अवघा देश सळसळू लागला. देशभक्तीची भावना प्रत्येक नागरिकाच्या धमन्यातून वाहू लागली. उर्मी उचंबळून आल्या, शास्त्रीकडे ना घराण्याची पुण्याई,ना वक्तृत्वाची जादू ,ना छाप टाकेल असे व्यक्तिमत्व; पण त्यांच्यापाशी होता निखळ  पारदर्शी, प्रामाणिकपणा व सचोटी. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांची मन त्यांनी जिंकली. शास्त्री यांच्या कारकिर्दीचा काळ भारावून टाकणाराच होता. परंतु त्यांचे लहानपण फार हलाखीत गेले लालबहादूर अवघ्या दिड वर्षाची असतानाच त्यांचे वडील शारदा प्रसाद यांचं प्लेगच्या साथीत निधन झाले आणि लालबहादूर व त्यांच्या घराची बिकट अवस्था सुरू झाली. कारण त्यांनी मागं काहीच पैसाअडका मालमत्ता जतन करून ठेवला नाही.

     वयाच्या बारा वर्षापर्यंत लालबहादूर मोगल साऱ्याला राहिले 1921 च्या जानेवारीमध्ये महात्मा गांधी बनारसला आले. त्यांच्या जाहीर सभेला लालबहादूर आपल्या मित्र परिवारासह हजर होते. त्या सभेला महात्मा गांधी, पंडित मदन मोहन मालवीय यांच्या भाषणाने प्रभावित होऊन राजकीय चळवळीत पडावं की नाही याची चर्चा होऊन परिणामांची पर्वा न करता राजकारणात उडी घेण्याचे ठरवले आणि जे. बी. कृपलानी यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. 1935 मध्ये 'भारत सरकार कायदा' मंजूर केला. या कायद्याअंतर्गत राज्यात विधिमंडळ स्थापन करणार, राज्यात जबाबदार सरकार स्थापन करणार अशी तरतूद होती. या कायद्यान्वये 1937 मध्ये निवडणुका झाल्या आणि अलाहाबाद  मधील एका मतदार संघातून लालबहादूर निवडून आले. त्यामुळे अलाहाबाद येथील त्यांचा राजकीय पाया आणखी दृढ झाला.

       काँग्रेसने 1941 मध्ये राजकीय चळवळीची नीट आखणी केली व काही निवडक नेत्यांना वैयक्तिक सत्याग्रह करण्यास सांगण्यात आले त्यात शास्त्रींचा अंतर्भाव होता. 19 ऑगस्ट 1941 रोजी त्यांना अटक करण्यात येऊन पाच महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. 1942 च्या मुंबई येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात 'भारत छोडो' ठराव मंजूर करण्यात आला. महात्मा गांधी तसेच अनेक नेत्यांबरोबर 19 ऑगस्ट 1942 रोजी शास्त्रींना अटक होऊन तीन वर्ष कारावासाची शिक्षा झाली. या तीन वर्षाच्या काळात शास्त्रींच्या कुटुंबीयांना खूप हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या.

      24 मार्च 1947 रोजी लॉर्ड माऊंटबॅटन यांचा नवे व्हॉइसरॉय म्हणून शपथ विधी झाला. स्वातंत्र्य मिळाले, पण देशाची फाळणी झाली. 1945 मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक होऊन शास्त्री यांच्या अथक परिश्रमाने उत्तर प्रदेश विधानसभा काँग्रेस जिंकून  शास्त्री यांना मुख्यमंत्र्याच्या संसदीय सचिव पदी नियुक्ती देण्यात आली. ते 1951 मध्ये काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस बनले 1952 नंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे व वाहतूक, दळणवळण व वाहतूक, वाणिज्य व उद्योग आणि गृहमंत्री पद ही पदं भूषवली. शास्त्री कधीही सत्तेमुळे मदांध बनले नाहीत. सत्तेचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. आपल्याला मिळणाऱ्या वेतणातच सारा खर्च भागविण्याची त्यांना सवय होती. 1951 19561963 त्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले. त्यामुळे शास्त्रींचे उत्पन्न घटले. तेव्हा महागड्या भाज्यांचा वापर त्यांच्या कुटुंबांने बंद केला. एवढेच नव्हे तर शास्त्री स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. 1966 साले शास्त्री यांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्यापाशी पैसे, घर जमीन यापैकी काही नव्हतं. बँकेत रक्कम नव्हती. किंबहुना कुटुंबाच्या वापरासाठी घेतलेल्या जिप चे पैसे ते हप्त्याहप्त्याने फेडत होते. शास्त्री रेल्वेमंत्री असताना कॉरिडॉर ट्रेन  सुरू झाली.चित्तरंजन येथील रेल्वे कारखान्याचे  उत्पादन वाढलं.तिथं दरवर्षी  120 ऐवजी 200 इंजिनाचे उत्पादन सुरू झालं. 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केलं व देशात आणीबाणी लावण्याचं काम गृहमंत्री या नात्याने शास्त्री यांच्या वर येऊन पडली.पण त्याचा दुरुपयोग करण्यात आला नाही.तसेच त्यांनी 1963 साली सी. बी. आय.ची स्थापना केली.

      पंडित नेहरू यांच्या अकाली निधनानंतर शास्त्री यांच्यावर पंतप्रधानपदाची जबाबदारी पडली .त्यावेळी त्यांच्या समोर उभ्या  राहिलेल्या समस्या म्हणजे अन्नधान्य टंचाई. म्हणून चौथ्या पंचवार्षिक योजनेत शेतीला अग्रक्रम दिला भाषिक पेचप्रसंग उभा राहिला तोही मोठ्या शिताफीने सोडला आणि सर्वात मोठा पेचप्रसंग म्हणजे 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर लागलेले युद्ध! युद्ध लादण्या   मागचा पाकिस्तानचा होरा असा होता. भारतात नवीन प्रंतप्रधान अधिकार आले होते व त्यांचा अजून जम बसायचा होता. भारतात अन्नटंचाई सह आर्थिक अडचण, 1962 भारत चीन युद्धात पराभूत झाल्याने भारतातील जनता व लष्कर यांचं नीतिधैर्य खचलं होतं. भूमी व हवाई दोन्ही आघाड्यावर पाकिस्तानकडे अधिक चांगली शस्त्रास्त्रे होती. इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून पाकिस्तानने वीगोकोट नजीकच्या सरदार ठाण्यावर 9 एप्रिल 1965 रोजी पहिला हल्ला चढवला सुरवातीला पद्धतीने व नंतर उघडपणे पाकिस्तान हल्ले करत राहिले पंतप्रधान शास्त्री अस्वस्थ झाले होते. शास्त्री हे शांततेचे पुरस्कर्ते व समन्वय वादी होते परंतु त्यावेळी कुरुक्षेत्रावरील अर्जुनाची भूमिका पार पाडावी लागली. 3 सप्टेंबर 1965 रोजी प्रतिहल्ला करण्यास शास्त्रीय लष्कराला अनुमती दिली आक्रमकांच्या भूमीत जाऊन लढा करण्याचा भारताच्या इतिहासातील तो पहिलाच प्रसंग होता परंतु पाकिस्तानमधील नागरी वस्त्यांवर हल्ले होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश शास्त्रींनी दिले.

         पाकिस्तान ने हल्ल्याचे समर्थन व इतर इस्लामी राष्ट्राचं आपल्याला समर्थन मिळावा या हेतूने भारतातील मुस्लीम दडपणाखाली जीवन जगत आहेत. अशी आवई पाकिस्तानने जगभर दिली. परंतु युनो मधील छगला यांच्या भाषणाने पाकिस्तानची पूर्ण बोलती बंद झाली. छगला स्वतः भारतीय मुस्लीम होते. हे धार्मिक युद्ध आहे. असे दाखवण्याचा पाक चा हेतू पूर्णपणे फसला. पाकिस्तान ला समर्थन व भारताची दोन्ही पातळीवर कोंडी करणे चीनने सुरू ठेवलं. चीनने भारताला खलीत्यावर खलीते पाठवायला सुरुवात केली आणि भारताला उचकावून, एका बाजूला पाकिस्तान  दुसर्‍या बाजूने चीन असा आक्रमण करणे. असा चीन चा डाव होता." भारतीय फौजांनी आमचा प्रदेश व सार्वभौमत्व यांचा भंग करीत आहेत. तसेच सिक्कीम हद्दीवर व त्या पलीकडे भारताने बांधलेली लष्करी बांधकाम पाडून टाकावीत" असा खलिता पाठवला. या घडामोडीत शास्त्रींच्या मुत्सद्देगिरीतील विनोदाची बारीक किनार होती. "सीमेपलीकडे चीन भारताची बांधकाम पाडून टाका. अशी मागणी करताना, प्रत्यक्षात भारतीय सैन्याला आपल्या प्रदेशात येण्याचं आमंत्रणच आपण देत आहोत हे त्यांना उमजले की नाही कोण जाणे!" अशा मिश्कीलपणे त्यांनी टिपणी केली.

          अशा या कठीण प्रसंगी देखील धैर्याने, खंबीरपणे पूर्ण बाबींचा विचार करणारे, बुद्धिमान दूरदृष्टीचे हेतू व निर्णय यात खंबीर आणि जबर इच्छाशक्ती असलेले नेते होते. ते स्वप्नात वावरणारे नव्हते, तर वास्तवाचे त्यांना भान होतं. त्यांच्या जबर निर्णय शक्तीचा प्रत्यय 1965 च्या भारत-पाक युद्धात जगाला झाला. त्यांच्या कणखरपणे भारताने युद्ध जिंकले. यानंतर 910 जानेवारी 1966 च्या ताश्कंद करार या वेळी भारताचे पंतप्रधान शास्त्री, पाकिस्तानचे अध्यक्ष आयुब खान व रशियाचे अध्यक्ष कोसिजिन यांच्यात अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ताश्कंद करारावर सह्या करण्यात आल्या. त्याच रात्री शास्त्री यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शोक यात्रा विमानतळ पोहोचली. तेव्हा पाक अध्यक्ष आयुब खान सोव्हिएत नेत्यांसमवेत शास्त्रींना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी हजर होते. शवपेटीका स्वतः कोसिजिन व आयुब खान यांनी खांद्यावर घेतली होती. आदल्यादिवशी युद्धात शत्रू असलेला नेता दुसऱ्या दिवशी जिव्हाळ्याचा दोस्त बनला व तिसऱ्या दिवशी आश्रू ढाळणारा शवपेटीकेचा वाहक ठरला. असं उदाहरण जगाच्या इतिहासात क्वचितच असेल. संपर्कात आलेल्या व्यक्तीला मित्र बनवण्याची कला शास्त्रींच्या स्वभावातच होती. पण असा हा भारताचा 'लाल' 10 जानेवारी 1966 रोजी अनंतात विलीन झाला. त्यांना भारताचे फार काळ पंतप्रधान पद भूषवता आलं नाही. हे एक दुर्दैवच म्हणावे लागेल अशा या महान नेत्यास शतशा सलाम!!!