आमच्या विषयी

उपक्रमांची खाण : शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवणारी आदर्श शाळा जरेवाडी !


देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे ।।
कवी बा.भ. बोरकरांच्या कवितेतील या सुप्रसिध्द ओळीचे यथार्थ जीवंत वर्णन जर कुठे पहायला मिळत असेल तर त्याचं समर्पक जीवंत उदाहरण म्हणजे जि.प.प्रा.शाळा जरेवाडी. या शाळेतील हर एक कृती ही नाविण्याने, कल्पकतेने बहरलेली असते. म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करत असो वा नसो या साऱ्यांसाठीच जरेवाडी शाळा पाहणे म्हणजे मंगलाने सुगंधित झालेला सुंदर सोहळा अनुभवण्याचे एक स्थान आहे. 24 पटसंख्या, एक शिक्षक, पहिली ते चौथीपर्यंत एकच वर्ग खोली असणाऱ्या शाळेचे  रुपांतर 836 विद्यार्थी, 18 शिक्षक, व पहिली ते आठवीपर्यंत वीस वर्ग खोल्यात भरणारी, उपक्रमांची खाण जरेवाडी शाळा किंवा जरेवाडी शाळेची सफर या शब्दप्रपंचातून पाहणार आहोत.
बालाघाटाच्या कुशीत वसलेली जरेवाडीची लोकसंख्या अवघी 400 आणि त्याच वाडीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची विद्यार्थी पटसंख्या आहे 836. गावच्या लोकसंख्येपेक्षा शाळेची पटसंख्या जवळपास दुप्पट. लोकसंख्येपेक्षा शाळेची  पटसंख्या जास्त असणे कदाचित हे एकमेव उदाहरण असू शकेल. या शाळेत शिक्षणाची धडे गिरवण्यासाठी सुमारे 52 ते 55 गावांतून विद्यार्थी येतात. खरं तर पट टिकवणे हे अनेक शाळासमोरील आव्हान आहे परंतू जरेवाडी शाळेवर पालकांनी जो विश्वास दाखवला आहे, तो साऱ्या राज्यभरातील शाळेंसाठी दिशादर्शक ठरेल. आज शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 8 वी पर्यंतच्या प्रत्येक वर्गाच्या दोन दोन तुकड्या आहेत. जून 2010 पासून सेमी माध्यम स्वीकारून, सन 2015 पासून सर्वच वर्ग हे द्विभाषा (सेमी) माध्यमाचे करण्यात आले आहेत. याच शैक्षणिक दर्जामुळे जरेवाडी शाळेला कधी विद्यार्थी संख्येचा प्रश्न भेडसावला नाही.
डोंगरी भाग असल्याने सुरूवातीपासून शाळेसाठी जागेचा प्रश्न. पण गावकऱ्यांच्या अखंड साथीमुळे शाळेत आज एकूण 18 वर्ग खोल्या, खेळाचे मैदान, भव्य डिजिटल हॉल आणि सुसज्ज अशी प्रयोगशाळा उपलब्ध आहे. उत्पादक आणि दानशूर समाज्याच्या समाज सहभागाचे आदर्श उदाहरण म्हणजे जरेवाडी. शाळेने आजपर्यत सुमारे 30 लक्षपेक्षा अधिक निधी समाज सहभागातून उभारला आहे. या समाज सहभागाच्या माध्यमातूनच शाळेमध्ये भरीव अशी कामे केली आहेत. पटसंख्येच्या तुलनेने कमी पडणाऱ्या वर्ग खोल्या, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, शाळेतील मुलांना निर्धोक पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टर, परीपाठाच्या मैदानासह इतर भागात ब्लॉक्स, डिजिटल शैक्षणिक साहित्य, प्रत्येक वर्गात ॲन्ड्राईड स्मार्ट टी.व्ही. एल.सी.डी प्रोजेक्टर आणि 10 कॉम्प्युटरने सुसज्ज अशी कॉम्प्युटर लॅब, विज्ञान साहित्यांने भरलेली विज्ञान प्रयोगशाळा, ई-लर्निंग साहित्य, सोलार विद्युत, शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये साऊंड सिस्टीम आणि C.C.T.V कॅमेरा, आकर्षक रंगकामासह बोलक्या भिंत्ती अशी अनेक कामे शाळेने लोकसहभागातून केलेली आहेत. शासनाच्या मिळणाऱ्या निधीमध्ये स्वत:चा निधी टाकून कामाचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्याचे काम येथील समाज सहभागाने केले आहे. म्हणतात ना लोकसहभाग करी शाळेचा विकास. या शाळेने विद्यार्थ्यांशी जुळलेली नाळ कधीच तोडणी नाही. शाळेतून शिक्षण घेऊन गेल्यानंतर सुध्दा शाळेचे माजी विद्यार्थी आणि शिक्षक सतत एकमेकांच्या संपर्कात असतात. अशा एकसंघ विचारातून माजी विद्यार्थ्यांनी शाळेला तब्बल दीड लक्ष रुपयांचा निधी स्मार्ट टि.व्ही. घेण्यासाठी उभा केला. यातून प्रत्येक वर्गात स्मार्ट टी.व्ही. बसविण्यात आलेले आहेत. अध्ययन अनुभव देताना दृक-श्राव्य साधनाची आवश्यकता असते ही गरज शाळेने माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने पूर्ण केली आहे. अशा जरेवाडी प्रशालेने भौतिक सुविधांमध्ये पुरेशा प्रमाणात संपन्नता मिळवली आहे.
जरेवाडी शाळेचे बाह्यांग जेवढे सुंदर आहे, जेवढेच तिचे अंतरंगही सुंदर आहे. शाळेत घेण्यात येणारे विविध उपक्रम, विविध स्पर्धत शाळेने मिळवलेले यश, शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता या सर्व कारणांसाठी जरेवाडी शाळा संबंध महाराष्ट्राला ज्ञात आहे. आजपर्यंत 238 पेक्षा अधिक विद्यार्थी स्कॉलरशिपधारक बनलेले आहेत. तर नवोदय प्रवेशासाठी 15 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. NMMS  व स्कॉलरशिप अशा स्पर्धात्मक परीक्षांचा निकाल नेहमीच जरेवाडी शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा असतो. त्याच बरोबर शासकिय चित्रकला परीक्षेतही विद्यार्थी सहभाग व यश लक्षणीय आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच येथील विद्यार्थी राज्य क्रिडा स्पर्धा, राज्य विज्ञान प्रदर्शन, विभागीय नाट्य, विभागीय निबंध स्पर्धा तसेच जिल्हास्तरीय विविध स्पर्धात कायम नावाजण्याजोगी व प्रभावी कामगिरी असते. स्काऊट – गाईड जिल्हा मेळाव्यात तर जरेवाडी शाळा कायम अव्वल स्थानावर असते. शाळेतील विद्यार्थ्यांसोबत गावातील नागरीकांच्या आरोग्य सुरक्षाबाबत शाळा नेहमीच सज्ज असते. शौचालय बांधकाम, शौचालयाचा वापर, मद्यपान,धुम्रपान त्यासोबत गावातील व्यसनमुक्ती करण्यासाठी शाळेला यश मिळालेले आहे. यासाठी शाळा नेहमीच कटीबध्द असते.
शाळेचे सर्वात खास आकर्षक म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम.पालकांच्या सहभागातून उभारलेल्या भव्य रंगमंचावर होणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमास जवळपास 7 ते 8 हजाराचा जनसमुदाय उपस्थित असतो. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी शाळेला दोन लक्ष रुपयांपर्यंत बक्षिस रुपाने समाज सहभाग प्राप्त झाला आहे. शाळेमध्ये राबविला जाणारा आणखी एक वार्षिेक सुंदर कार्यक्रम म्हणजे शिक्षणोत्सव, हा उपक्रम शाळेला शिक्षण जत्रेचे रुप देतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला- गुणांना वाव मिळतो. विद्यार्थी शिक्षक यांच्या कल्पकतेतून एकूण 60 पेक्षा अधिक स्टॉल या शिक्षणोत्सवात असतात. काला सोना गुलाबजाम, चटकदार भेळ, वडापावपासून ते वैज्ञानिक संकल्पनांचे प्रयोग व प्रात्यक्षिक अशा नानावीध विषयावर आधारीत स्टॉल शिक्षणोत्सवात असतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि विज्ञान जिज्ञासा जागृत होण्यास मदत होते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरामध्ये ‘ज्ञानवर्धिनी’ हे स्वलिखित हस्तलिखित गेल्या 19 वर्षापासून प्रकाशित केले जाते. त्याच सोबतच जरेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे 150 स्वरचित काव्यसंग्रह शाळेने प्रकाशित केले आहेत. अशा या उपक्रमांच्या मोहळामध्ये ‘Each one teach one’ , साप्ताहिक गुणवत्ता विकास परीक्षा, सामान्यज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धा, Math Talent Search Exam, राष्ट्रीय सणानिमित्ताने घेण्यात येणारी ‘कोण होईल ज्ञानवंत ?’ प्रज्ञाशोध परीक्षा, गणित समृध्दी उपक्रम, ज्ञानवाहक, गोष्ट विज्ञानाची, नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्र, गणित- भाषा प्रयोगशाळा, गणितपेटी, वाचनपेटी यांच्यामदतीने आनंददायी शिक्षण, अधिकच्या मार्गदर्शन तासिका, वाचन तासिका, कृतीयुक्त अध्ययन अध्यापन गट पध्दती अशा सर्व उपक्रमांमुळे जरेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता एक पाऊल पुढे अशी आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये आणखी काही उपक्रम हाती घेतलेले पहायला मिळतात. उदाहरणार्थ हस्तकला विकासासाठी कलादालन, गायनाचा सराव करण्यासाठी करा ओके म्युझिम स्टुडिओ, नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्र सातून सुमारे 520 वैज्ञानिक संकल्पना विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. विज्ञान ग्रंथालय, तसेच वर्ग ग्रंथालय, मासिके, इंग्रजी वर्तमानपत्रे, राजू मिनामंच, योगाभ्यास, कन्यासुरक्षा, ग्रेट भेट, जरेवाडी कट्टा यातून अनेक मान्यवरांच्या मुलाखती विद्यार्थी घेतात. विद्यार्थ्यांना मुक्त व्यक्त होण्यासाठी कथा-कथन, चित्र रेखाटन, रंगभरण, वार्षिक हस्तकला प्रदर्शन अशा शाळास्तरावरील उपक्रमासोबत शासनाच्या वेगवेगळया उपक्रमामध्ये शाळेतचा सक्रिय सहभाग नेहमीच प्रामाणिकपणे असतो. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शाळा सिध्दी, स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धा, स्वच्छ गाव सुंदर गाव, हगणदारी मुक्त गाव, शिक्षणाची वारी अशा सर्वच शासकिय उपक्रमामध्ये शाळा अग्रेसर असते. पौढ साक्षरता अभियानांतर्गत राज्यातील पायलट प्रोजेक्ट सध्या जरेवाडी शाळेत सुरू आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने गावातील निरक्षरांना शिक्षणांचे धडे गिरवण्याचे अनमोल काम इथं चालू आहे.
ऊसतोड कामगारांचा जिल्हा बीड अशी ओळख असलेल्या जिल्ह्यात अनेक वर्षापासून पालकासमवेत कारखान्यावर पालक स्थलांतर करताना अनेक विद्यार्थी बरोबर घेवून जातात. जरेवाडी गावातील जवळपास 90% लोक ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. परंतू शाळेच्या उत्कृष्ट नियोजनामुळे गेल्या 22 वर्षात एकाही विद्यार्थ्याचे कारखान्यावर स्थलांतर होऊ दिले नाही अथवा विद्यार्थ्यांने मधेच शाळा सोडली नाही. हे स्थलांतर रोखण्यासाठी सुरुवात प्रथम गावकऱ्यांच्या मदतीने केली. मुलांच्या जेवणाची सोय गावकऱ्यांनी केली. आज मात्र हंगामी वसतिगृह शाळेत चालू असून स्थलांतराचा प्रश्न यामाध्यमातून सुटला आहे. गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्व समजले आहे त्यामुळे आपल्या पाल्यास आपल्यासमवेत कारखान्याला ऊसतोडणीसाठी घेऊन जात नाहीत. हंगामी ऊसतोड वसतीगृहात ठेवतात.
जरेवाडी शाळेचा एक सर्वोत्कृष्ट उपक्रम म्हणजे संगीतमय परीपाठ, हा परीपाठ म्हणजे ज्ञानाचा खजिनाच होय. तासभर चालणाऱ्या या परीपाठाच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढी बरोबरच सर्वांगीण गुणवत्ता विकासाचे उद्दिष्ट साध्य होत असल्याचे आपणास पहावयास मिळते. म्हणून शाळा पहाण्यासाठी येणारे पाहूणे परीपाठ पाहण्याचा हट्ट धरतात.परीपाठ पहायचाय तर मग जरेंवाडी चला अशा शिर्षकाखाली वर्तमानपत्राने परीपाठासंबंधीचे लेख प्रकाशित केले आहेत. यावरुन शाळेच्या परीपाठाची नाविण्यता समजते. नेतृत्वगुण, संकल्पवृत्ती, वत्कृत्व कौशल्य, समायोजन, प्रसंगावधान अशा अनेक कौशल्यांची रुजवणूक या परीपाठाच्य माध्यमातून विद्यार्थ्यांत होते.
बीड जिल्ह्यातील पहिली ISO शाळा बनण्याचा मान जरेवाडी शाळेला मिळाला. शाळा सिध्दीमध्ये ‘अ’ श्रेणी प्राप्त शाळा. म्हणूनच अशा या गुणवेत शाळेला वेगवेगळया जिल्ह्यातील लोक भेट देण्यासाठी येतात. आजपर्यंत शाळेला 15 हजारपेक्षा अधिक शिक्षणप्रेमीनी भेट दिलेली आहे. महाराष्ट्राचे पूर्व टोक म्हणजे चंद्रपूर. येथील शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नागरीक शाळेला भेट देण्यासाठी दोन वेळा आले. तसेच शाळेला उच्च पदस्त अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यात जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, विभागीय आयुक्त,माजी शिक्षण संचालक इत्यादीसमवेत कॅबीनेट ग्रामविकास मंत्री, महसूल राज्यमंत्री, जिल्हा परीषद अध्यक्ष, वेगवेगळया विभागाचे सभापती, जि.प.सदस्य, शासकिय- निमशासकिय संस्था, एनजीओ संस्था, इंदीरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या संचालिका, सर्व शिक्षा अभियानांतर्गत येणारे विविध पथके या सर्वांनी शाळेला भेट देऊन केलेल्या कामाची दखल घेत पाठीवर कौतूकाची थाप टाकली.
वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मिडीया, ABP माझा, सह्याद्री इ. वाहीन्याकडून शाळैच्या लेखा-जोखा अनेक वेळा दाखवण्यात आला आहे. सन 2007 मध्ये सकाळ वृत्तपत्रात जरेवाडी शाळेवर संपादकिय लेख आणि या लेखाचे वाचन करून माजी शिक्षण संचालक वि.वि.चिपळूणकर यांनी शाळेला आवर्जून लिहिलेले अभिनंदन पत्र, अशा अनेक प्रेरणादायी व्यक्तीच्या प्रोत्साहन आणि कौतूकाच्या थाप जरेवाडी शाळेला एक प्रकारची उर्जा देत गेली. म्हणूनच ही शाळा सर्वागिण विकासाचे, शिक्षणाचे एक आदर्श मॉडेल बनले.
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य भरीव आणि कौतुकास्पद असेच आहे. शाळेसाठी जागा दान देणे, शाळेमध्ये वेगवेगळया कामासाठी श्रमदान करणे, शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूरुपाने दान देणे,  गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सदैव तत्परता दाखवणे इत्यादी महत्वाच्या बाबी शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यामार्फत पूर्ण केल्या आहेत. म्हणूनच लोकसंख्या कमी असून देखील सुमारे तीस लक्ष रुपयांचा लोक सहभाग शाळा व्यवस्थापन समितीच्या क्रियाशिलतेमुळे शाळेस मिळाला आहे.
नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी करतात. शाळेतील तुकडीनिहाय Whats app  Group, स्थापन केलेले असून त्यामाध्यमातून दैनंदिन दिलेला अभ्यास विद्यार्थी सोडवतात. तसेच Online साप्ताहिक परीक्षाही देतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना Skype च्या माध्यमातून विविध शिक्षणतज्ञ आणि प्रेरणादायी व्यक्तीशी संवाद घडवून आणला जातो. ज्या ठिकाणी आपणास प्रत्यक्ष भेट देणे शकय होत नाही अशा ठिकाणास Verchual Trip च्या माध्यमातून त्या ठिकाणांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.
आज या शाळेत संदीप पवार या उत्कृष्ट शिल्पकारासह मुख्याध्यापक कदम सर, कोकणे सर, सुळे सर, उध्दव पवार सर, अतुल पवार सर, शेख सर, कैलास पवार सर, शिंदे सर, बारवकर सर, जाधव सर, युवराज पवार सर, बेदरे सर, भोगे सर,, दहिफळे सर, डोंगर सर, श्रीम.जाधव मॅडम, श्रीम.पोटभरे मॅडम ही सर्व शिक्षक टिम विद्यार्थ्यांच्या विविध पैलूंना आकार देण्याचे अविरतपणे कार्य करत आहे. आजपर्यंत आलेल्या सर्व अडचणीवर मात करुन जरेवाडी शाळेतील सर्व गुरुजन व ग्रामस्थांनी अथक व अखंड प्रयत्नातून हे गुणवंत रुप धारण केले आहे.
म्हणून याबद्दल म्हणावेसे वाटते.
देखणी ती पाएफले जी घ्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनी सुध्दा स्वस्तिपद्ये रेखिती ।।
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे ।।

शब्दांकन
श्री.पवार उध्दव साहेबराव
( सहशिक्षक प्रा.शा.जरेवाडी )
मो. 9421480792


No comments:

Post a Comment