Saturday, 16 July 2022

ओढाताण

ओढाताण

         दसरा झाला आणि ऊसतोडणी साठी कारखान्याकडे जाण्याची लगबग सुरू झाली. आता मराठवाड्यातील गावच्या गाव निर्मनुष्य आणि भकास वाटू लागलीत. असाच एक  भागवत आणि सीता यांचा कुटुंब कबिला.  ऊसतोडणी साठी कारखान्यावर चालली होती. पावसाची रिपरिप चालू होती. पडत्या पावसात भागवत आणि सीताचा संसार ट्रॅक मध्ये भरला जात होता. पावसात बी जीवाला आराम नव्हता‌ ,की कसलं थांबणं नव्हत. सीता म्हणायची." आता कसला आलाय आराम ? आता आराम  मारतीच्या मागं, मसनवट्यातच." सीताला परिस्थितीनं पिळवटून टाकलं होतं.  जवळपास अर्धा वर्ष परमुलखात वास्तव्य करायचं होतं. म्हणून सीतानी जोपर्यंत रहावा लागंल ,तोपर्यंत लागणारं तिखट ,मीठ इथूनच घेतलं होतं. तिथं कुठं एका जागेवर बस्तान बसवायचं होत? कुठंही मुक्काम करावा लागतो. 'ईचाचं बिऱ्हाड पाठीवर' होतं.' 'मसनवटा असूद्या ,नाहीतर विचू काटा असूद्या.' जिथं जागा भेटंल. तिथं तीन दगडाची चूल मांडून पोटाची  खळगी भरावा लागती .गावाचा वारा जवळपास फिरकणार बी नव्हता. म्हणून इथूनच समदी तजवीज करावी लागती. सगळ्या तयारीसाठी सीतालाच झटं द्यावं लागत होतं. चटणी कुटून आणणं,दळण- दुळण आणणं, कारखान्यावर गेल्यावर काय काय लागंल ?याची सगळी यादी सीताच्या तोंडपाठ होती. सीता काय आज पहिल्यांदाच कारखान्याला चालली नव्हती. तिची पहिली पिढी आणि आता दुसरी पिढी कारखानाच करीत होती. दोनेक महिन्यापासनं  तयारीला लागून लगत वार लागणारं समदं साहित्य गोळा करून ठेवलं होतं. सातवीत शिकत असलेला आदित्य आणि चौथीत शिकत असलेला  सार्थक , आपापल्या परीने बारीक सारीक वस्तू, पसारा भरायला आईला मदत करीत होती. सगळ्यात लहान पाच सहा वर्षाची चिमणी, शिवाली आईच्या पायाशी घुटमळत  होती.‌  सीता चिडायची. एकीकडं आईची माया आणि काम दोन्ही सुटत नव्हतं. दोन्हीत जीव घुटमळत होता. पण माया थोडी बाजूला ठेवून पसारा भराभरी कडे लक्ष द्यावं लागायचं. लेकरांना वर्षातले अर्धे दिवस आई पासून दूर राहावं लागायचं.लेकरांची आबाळ व्हायची.  पोटुशी असताना मोळ्या वाहिल्या, कधीही आराम मिळाला नाही. अन  लहान लहान लेकरांना पाचराटात झोपी लावून, ओल्या बाळंतपणात ऊस तोडून, ऊसाच्या मोळ्या वाहिल्या होत्या. नवरा म्हणणारा भागवत हमेशाच दारू डोसायचा. कारखान्याला ऊस तोडणीचं‌ काम करायचा, ती‌ बी रोज नशेतच‌ असायचा आणि गावाकडं‌ बी नशेतच असायचा. आजही फुल झिंगला होता.  त्याच्यापाशी बऱ्याच जणांचं कोंडाळं जमलं होतं. कसल्या तरी पैशा वरून हमरी तुमरी चालली होती.कोणीतरी भागवतला गचांडी गुचांडी करत होतं. हा सगळा हल्लकल्लोळ ऐकून, सिता हातातलं काम सोडून भागवत कडं आली. तर भांडण ऐकून चाटच पडली होती. भागवतने दोन मुकादमाकडून कारखान्याची उचल घेतली होती आणि दारुपायी घातली होती. याची थोडीबी कल्पना सीताला नव्हती. आता तो मुकादम माझ्या टोळीत कारखान्याला चल म्हणून हट्टाला पेटला होता . त्याचं ही खरं होत. त्याच्याकडून ज्या कारणासाठी उचल घेतली होती. ते कारण भागवतने धुडकावून लावलं होतं. सीता गयावया करत होती. पण मुकादम काही केल्या ऐकायला तयार नव्हता. काही बाही शिव्या देत होता. अद्वा तद्वा बोलत होता. पण त्याच्या लक्षात आलं, जास्तीचं  भांडून काही उपयोग होणार नाही. आपले पैसे तरी काढून घ्यावेत, "मग माझे पैसे आत्ताची आत्ता द्या, तरच जाऊ देतो. नाहीतर भाग्या हरामखोराला उचलून नेतो." म्हणायचा. आता सीताला थोडसं हायसं वाटलं. याचे पैसे देऊन सध्याचा रस्ता मोकळा करता येईल. सीतानी दुसऱ्या मुकादमा हातापाया पडून, गयावया करून त्याच्याकडून पैसे घेऊन पहिल्या मुकादमाचा व्यवहार मिटविला आणि सिताचा जीव सध्या तरी  भांड्यात पडला. अन् सीता पुन्हा आपल्या कामाला जुपली. सीता कामाकड वळत नाही, तोच पुन्हा भागवत जवळ गलका सुरू झाला. एका समस्येतून मार्ग निघत नाही, तोच आता अजून काय समस्या उभी राहिली ? बघते तर काय ! भागवतनी दुकादारांकडून केलेल्या उधाऱ्या, लोकांकडून घेतलेले हात उसने ,काही सावकारांचे बेभावाने घेतलेली कर्जाऊ रक्कम,आता सहा महिने आपल्याला आपले पैसे मिळणार नाहीत. म्हणून भागवत भोवती कोंडाळं केलं होतं. पुन्हा सीता गयावया करीत होती .कसा का असंना कुंकवाला  धनी होता. म्हणून पुन्हा पहिला पाढा गिरवित काहींचे निमे अर्धे पैसे देऊन, पुन्हा आपल्या कामाला लागली.

          सगळा पसारा पूर्ण भरल्यावर सीतानी नवऱ्याला ओढीतच ट्रकमध्ये कोंबलं. आपल्या लेकरांना दाटल्या कंठानी समजून सांगत होती.

      " हे बघ पिल्या, सार्थक ,शिवालीकडं लक्ष देत जा. त्यांना काय पाईजे, काय नकु बघत जा. तु मोठा हाईस. हिरी- बारवाकडं जात जाऊ नका. आजीचं ऐकत जा. आजीने सांगितलेली कामं करत जा " सांगताना दाटलेला कंठ , हुंदक्या सरशी मोकळा झाला. आपल्या पिलांना पदराखाली घेऊन रडू लागली. काही केल्या रडु आवरता येत नव्हतं . तिच्या मोरं सगळं वर्तमान आणि भविष्य उभा राहत होतं. व्यसनी नवऱ्या बरोबरचा संसार, रानाची मशागत , लेकरांचे शिक्षण. शेत हाई म्हणायला हाई, त्यानं काही 'पुरंना बी अन् उरंना बी' अशातली गत. कारखान्याला गेलं, तर हाई तेवढं रान पडाक पडायचं‌ .लेकरं वणवण व्हायची . गेल्या शिवाय जगणं होत नव्हतं. अशी तारेवरची कसरत सीताला‌ करावा लागत होती. अशी 'ओढाताण ' लग्न झाल्यापासून  चालू होती आणि नवऱ्याने दारू नाही सोडली, तर आयुष्यभर राहणार होती.

No comments:

Post a Comment